मडगाव होलसेल मासळी मार्केटातील किरकोळ विक्री पूर्णत: बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 06:39 PM2020-01-23T18:39:51+5:302020-01-23T18:40:38+5:30
पार्किगच्या मनमानी शुल्क आकारणीवरही निर्बंध आणणार
मडगाव: मडगावच्या होलसेल मासळी मार्केटात किरकोळ मासे विक्रीवर पूर्णत: बंदी आणण्याचा निर्णय एसजीपीडीएने घेतला असून लवकरच या मार्केटात वाहनांच्या पार्किगचे दरही निश्चित करुन त्यासंबंधीचे फलक मार्केटात लावले जाणार असल्याची माहिती एसजीपीडीएचे अध्यक्ष विल्फ्रेड (बाबाशान) डिसा यांनी दिली. गुरुवारी त्यांनी रांपणकार संघटना आणि मासे विक्रेत्यांबरोबर बैठक घेऊन त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या. मडगावच्या या मार्केटाच्या स्वच्छतेवरही भर दिला जाईल असे त्यांनी सांगितले.
या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डिसा यांनी एसजीपीडीए मार्केटात कित्येकांकडून अनधिकृतरित्या शुल्क गोळा केले जाते, त्यांच्यावरही आता अंकुश आणला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी एसजीपीडीएचे सदस्य रुपेश महात्मे तसेच रांपणकार संघटनेचे ऑलेन्सियो सिमॉईस हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना डिसा म्हणाले, होलसेल मासळी मार्केटात किरकोळ मासे विक्री केल्यामुळे इतर विक्रेत्यांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे ही विक्री पूर्णपणे बंद केली जाणार आहे. त्याशिवाय गोव्यातील रांपणकारांना त्यांची वाहने मार्केटमध्ये पार्क करुन ठेवण्यासाठी जागाही उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या मार्केटातून काही जणांकडून बेकायदेशीररित्या मनमानी स्वरुपात पार्किग शुल्क आकारले जाते त्यावरही नियंत्रण आणण्यासाठी वेगवेगळ्या वाहनांसाठी वेगवेगळे दर ठरवून त्याची माहिती फलकाद्वारे विक्रेत्यांना करुन दिली जाईल असे सांगितले. मागच्या 16 वर्षात एसजीपीडीए मार्केटातील सोपो शुल्काची पावणीही झालेली नाही यावरही लक्ष घालू असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मासळीचे पाणी ङिारपल्याने हे होलसेल मार्केट घाण होते. त्यामुळे सगळीकडे दरुगधी पसरते त्यामुळे या मार्केटाचा तळ सिमेंट घालून बांधावा अशी विक्रेत्यांकडून मागणी होत आहे. प्राधिकरणाच्या येत्या बैठकीत त्यावरही विचार केला जाईल असे त्यांनी सांगितले.