राजकारणातून मी निवृत्त, शैक्षणिक कामातच लक्ष! माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांचा 'लोकमत'शी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2024 01:52 PM2024-05-02T13:52:01+5:302024-05-02T13:54:10+5:30

मी निवृत्त झाल्याने मी स्वतः आता राजकारणाविषयी जास्त विचार करत नाही.

retired from politics and focus on academic work said former chief minister pratap singh rane interaction with lokmat goa | राजकारणातून मी निवृत्त, शैक्षणिक कामातच लक्ष! माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांचा 'लोकमत'शी संवाद

राजकारणातून मी निवृत्त, शैक्षणिक कामातच लक्ष! माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांचा 'लोकमत'शी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: 'मी राजकारणातून निवृत्त झालेलो आहे. पूर्वीसारखी आता मी धावपळ करत नाही. मी माझ्या शैक्षणिक संस्थांच्या कामातच लक्ष घातले आहे, असे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांनी काल 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

राणे म्हणाले, की मी पन्नास वर्षे राजकारण केले. माझे वय आता ८० पेक्षा जास्त झालेले आहे. अशावेळी मला पूर्वीसारखी धावपळ नको आहे. म्हणून मी राजकीय कामापासून दूर राहिलो आहे. मी पन्नास वर्षे विधानसभेत होतो. शिवाय अनेक वर्षे मुख्यमंत्री होतो. तेवढे खूप झाले. मी निवृत्त झाल्याने मी स्वतः आता राजकारणाविषयी जास्त विचार करत नाही.

माझ्याकडे काही विद्यालये आहेत. पर्ये येथे कॉलेजसाठी इमारतही बांधून घेणार आहे. मी शैक्षणिक कामातच लक्ष घालतो, शिवाय आमची शेती-धंदा असल्याने ते करतो. शाळा, हायस्कूल, हायरसेकंडरीशी संबंधित कामात मी व्यस्त असतो. त्या शिवाय मी तीन मंदिरांशीसंबंधित आहे. कारापुरसह, विठ्ठलापुरचे मंदिरही आहे.

अमेरिकेसारखी शिस्त हवी

गोव्यात वाढलेले वाहन अपघात चिंताजनक आहे, असे राणे म्हणाले. मी अमेरिकेत चार-पाच वर्षे होतो. तिथे मी परवाना घेतला होता व वाहन चालवत होतो. तिथे व्यवस्थित लेखी परीक्षा वगैरे द्यावी लागते, मगच परवाना मिळतो. अमेरिकेसारखे वाहतूक नियम हवेत, शिस्त हवी. अमेरिकेत उजव्याबाजूने वाहन चालवावे लागते. मी परवाना घेतल्यानंतर पहिल्याचवेळी चुकून एकदाच डाव्याबाजूने वाहन चालवायला गेलो, त्याबरोबर समोरून येणारे वाहन थांबले. मग मात्र मी अमेरिकेत कधी डाव्याबाजूने चालवले नाही.

तरुणांनीच राजकारण करावे

प्रतापसिंग राणे म्हणाले की, राज्यातील तरुणांनी आता राजकारणात येण्याची गरज आहे. शिक्षित तरुण राजकारणात आल्यास त्याचा राज्याला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे नव्या दमाच्या तरुणांनीच राजकारण करावे. माझा लोकांशी संपर्क आहे. पर्येसह सत्तरी तालुक्यातील लोकांच्या गाठीभेटी होतात. मी तंदुरुस्त आहे, फिट आहे. रोज सकाळी व्यायाम वगैरे करतो. आणखी राजकारण मात्र मला नको.

 

Web Title: retired from politics and focus on academic work said former chief minister pratap singh rane interaction with lokmat goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.