परतीच्या पावसाने भात पीक आडवे, शेतकऱ्यांवर संकट; भरपाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2024 07:25 AM2024-10-23T07:25:48+5:302024-10-23T07:26:47+5:30

बळीराजाला यंदा अतिवृष्टीने हैराण केले. सतत पडलेल्या पावसामुळे सुरुवातीला शेतकऱ्याला दुबार पेरणी करावी लागली.

returning rains hamper the rice crop distress for the farmers demand for compensation | परतीच्या पावसाने भात पीक आडवे, शेतकऱ्यांवर संकट; भरपाईची मागणी

परतीच्या पावसाने भात पीक आडवे, शेतकऱ्यांवर संकट; भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: ऐरवी शेतात चांगले पीक यावे म्हणून पावसासाठी देवाला साकडे घालणाऱ्या बळीराजाला यंदा मात्र अतिवृष्टीने हैराण केले. सतत पडलेल्या पावसामुळे सुरुवातीला शेतकऱ्याला भातशेतीत दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर मोठ्या कष्टाने पिकवलेले पीक काढणीला आले असता पुन्हा पाऊस सुरू झाल्याने ते आडवे झाले. आता शेतात आडवे झालेल्या भाताला पुन्हा कोंब येऊ लागले आहेत. त्यामुळे यंदा शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

यंदाच्या हंगामात पावसाला सुरुवात झाल्यापासून आनंदित झालेल्या शेतकऱ्याने लागवड लवकर पूर्ण व्हावी यावर भर दिला. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्याने पेरणी केलेले बियाणे वाहून गेल्याने दुबार पेरणी पुन्हा करणे भाग पडले. तर, काही शेतकऱ्यांनी केलेली लागवड पाण्याखाली गेल्याने झालेल्या परिणामातून पुन्हा लागवड करावी लागली.

दुबार केलेल्या लागवडीतून सतत बऱ्याच शेतात चांगले पीक आले होते. त्यामुळे तो आनंदित झालेला. काही शेती पिकण्याच्या मार्गावर असल्याने त्यांनी कापणीची तयारी सुरू केली होती. पण, परतीच्या पावसाने धडाका लावल्याने काढणीला आलेली शेती आडवी झाली आहे. शेतात पाणी साचून त्यातच भाताचे पीक आडवे झाल्याने त्याला कोंब येऊ लागले आहेत. बार्देश तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

राज्यात पावसाने संपूर्ण हंगामात मुसळधार हजेरी लावली. पेरणीच्यावेळी पावसाने शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला. मात्र, त्यानंतर जोर वाढल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. दुबार पेरणी करून मोठ्या कष्टाने आलेले पीक परतीच्या पावसाने वाहून नेल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. नानोडा येथील शेतकरी कृष्णा गावस, गुरु गावस यांच्यासह गावातील १० हून अधिक शेतकऱ्यांच्या भात पिकाचे नुकसान झाले आहे.

डोळ्यादेखत पीक गेले 

कृषी विभागीय कार्यालयातून पिकलेल्या शेतींची कापणी व्हावी यासाठी कापणी यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली होती. पण, पडणाऱ्या पावसामुळे भात कापणी करणे शक्य होत नसल्याने तसेच ओल्या शेत जमिनीतून मशीनचा वापर करणे अडचणीचे ठरत असल्याने परिणामात भर पडली आहे. तसेच हळदोणा, मयडे, शिवोली, सुकूर सारख्या भागातील शेती खराब होऊन त्यांना कोंब फुटू लागले आहेत.

नुकसान भरपाई द्या...

नास्नोळा फार्मर्स क्लबचे अध्यक्ष विठ्ठल नाईक यांनी सांगितले की, पहिल्या पावसामुळे पेरणी वाया गेली. आता काढणीला आलेले पीक परतीच्या पावसाने वाहून नेले. भातशेती आडवी झाल्याने आता पिकाला कोंब येऊ लागले आहेत. त्यामुळे कृषी विभागाने याची दखल घेऊन शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य भरपाई द्यावी.

पावसातून पिकलेली शेती खराब होण्याच्या काही तक्रारी विभागीय कार्यालयात आल्या आहेत. अद्यापपर्यंत सुमारे ४ शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी करणारे अर्ज दाखल केले आहेत. - संपती धारगळकर, कृषी विभागीय अधिकारी

 

Web Title: returning rains hamper the rice crop distress for the farmers demand for compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.