अरे व्वा! राज्यात नऊ महिन्यांत ३६५.४३ कोटींनी वाढला महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2025 07:18 IST2025-01-01T07:17:28+5:302025-01-01T07:18:07+5:30
एप्रिल ते डिसेंबर दरम्यान ४६१४.७७ कोटी रुपये झाले जमा

अरे व्वा! राज्यात नऊ महिन्यांत ३६५.४३ कोटींनी वाढला महसूल
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सरत्या वर्षात आशादायी चित्र म्हणजे राज्य सरकारच्या महसुली संकलनात चालू डिसेंबर महिन्यात लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबरच्या तुलनेत महसुलात ७५.५१ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. यातून सकारात्मक आर्थिक गतीचे संकेत मिळत आहेत.
एप्रिल ते डिसेंबर २०२४ या कालावधीत गोव्याचा एकूण महसूल ४६१४.७७ कोटी रुपये आहे व तो गेल्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत ३६५.४३ कोटी रुपये जास्त आहे. २०२३ मध्ये याच कालावधीत ४२४९.३४ कोटी रुपये महसूल सरकारला मिळाला होता. या भरीव वाढीमध्ये जीएसटी आणि व्हॅट या दोन्ही महसुलांचा समावेश आहे.
एप्रिल ते डिसेंबर या गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत जीएसटी महसुलात ९.६२ टक्के वाढ दिसली, जी कर सुधारणा आणि आर्थिक प्रभाव दर्शवते. याच कालावधीत व्हॅट महसूल देखील ६.४१ टक्क्यांनी वाढला. जीएसटी आणि व्हॅट अशी एकत्र महसूल वाढ ८.६० टक्के आहे.
विक्रमी संख्येने पर्यटकांच्या आगमनाचा फायदा : मुख्यमंत्री
यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'राज्याची सुधारित आर्थिक कामगिरी यातून दिसून आली आहे. हे आकडे गोव्याची आर्थिक वाढ आणि राजकोषीय सुदृढतेवर प्रकाश टाकतात. महसुलासाठी डिसेंबर महिला एक महत्त्वाचा टप्पा ठरला. पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. विक्रमी संख्येने पर्यटकांच्या आगमनाने या वाढीला चालना देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.'