महसूलप्राप्तीत २५ टक्के घट!
By admin | Published: March 5, 2015 01:28 AM2015-03-05T01:28:08+5:302015-03-05T01:32:50+5:30
पणजी : गतवर्षीच्या अर्थसंकल्पात महसूलप्राप्तीबाबत जेवढे लक्ष्य सरकारने निर्धारित केले होते, त्या तुलनेत २५ टक्के घट
पणजी : गतवर्षीच्या अर्थसंकल्पात महसूलप्राप्तीबाबत जेवढे लक्ष्य सरकारने निर्धारित केले होते, त्या तुलनेत २५ टक्के घट आढळून आल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी सांगितले.
येथे एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री आले होते. त्या वेळी पत्रकारांनी पार्सेकर यांच्याशी संपर्क साधून अर्थसंकल्पाची तयारी, नियोजित तरतुदी व महसूलप्राप्तीच्या विषयाबाबत विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की, अर्थसंकल्प हा पूर्णपणे रोजगारनिर्मितीवर भर देणारा असेल. सध्या ज्या कल्याणकारी योजना आहेत, त्याच सरकार पुढे नेईल. त्या योजना पुढे नेणे हे आव्हानात्मक असताना आणखी नव्या योजना तयार केल्या जाणार नाहीत. सुशिक्षित युवक-युवतींसाठी रोजगारनिर्मिती करणे हीच एक मोठी कल्याणकारी योजना ठरेल.
महसूलप्राप्तीसंबंधी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गतवर्षीच्या अर्थसंकल्पात जेवढी महसूलप्राप्ती दाखविली गेली होती, तेवढी झालेली नाही. कारण खनिज व्यवसाय बंद राहिला. खाण व्यवसाय सुरू न झाल्यामुळे याचा फटका स्वाभाविकपणे महसूलप्राप्तीला बसला. महसुलात २५ टक्क्यांची घट झाली, तरी चिंता करण्याचे कारण नाही. यापुढे खनिज खाणी निश्चितच सुरू होणार आहेत. (खास प्रतिनिधी)