टॅक्सी चालकांसाठी वाहतूक कायद्याची उजळणी
By पंकज शेट्ये | Published: October 7, 2023 07:24 PM2023-10-07T19:24:46+5:302023-10-07T19:25:53+5:30
शनिवारी (दि.७) वास्को वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोव्याच्या दाबोळी विमानतळावरील टॅक्सी चालकांसाठी खास कार्यक्रम आयोजित करून वाहतूक कायद्याची उजळणी केली.
वास्को: ६ ते १२ ऑक्टोंबरपर्यंत गोव्यात १२ वा राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने राज्य वाहतूक विभागातर्फे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने विविध जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. शनिवारी (दि.७) वास्को वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोव्याच्या दाबोळी विमानतळावरील टॅक्सी चालकांसाठी खास कार्यक्रम आयोजित करून वाहतूक कायद्याची उजळणी केली.
दाबोळी विमानतळावरील प्रवाशांची भाडी मारणाऱ्या टॅक्सी चालकांची गोव्याच्या रस्त्यावर दररोज मोठी वर्दळ असते. वास्को वाहतूक विभागाने १२ व्या राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने दाबोळी विमानतळावरील ‘युनायटेड युनियन टॅक्सीमेन असोसिएशन’ च्या टॅक्सी चालकांसाठी शनिवारी विमानतळावर खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात वाहतूक कायद्याचे का पालन करावे याचे महत्व टॅक्सी चालकांना पुन्हा एकदा समजवण्यात आले. वाहतूक कायद्याचे पालन केले नसल्यास अपघात होऊन स्व:ताचा अथवा दुसऱ्याचा जीव धोक्यात पडू शकतो याची आठवण वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी करून सर्वांनी वाहतूक कायद्याचे पालन करून वाहने चालवावी अशी विनंती केली.
स्व:ताच्या सुरक्षेसाठी वाहन चालवताना ‘सीट बेल्ट’ चा वापर करावा असे टॅक्सी चालकांना पुन्हा एकदा सांगण्यात आले. वाहतूक कायदे सर्वांच्या सुरक्षेसाठी असून त्यांचे पालन केले नसल्यास संबंधित व्यक्तीला मोठा दंड पडण्याबरोबरच त्याचा वाहन चालवण्याचा परवानाही निलंबित होऊ शकतो याची आठवण करून देण्यात आली. यावेळी वाहतूक काद्यांशी जुळलेल्या विषयांवर प्रश्नमंजुशा स्पर्धा घेऊन ज्या टॅक्सी चालकांनी योग्य उत्तर दिले त्यांना बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना वास्को वाहतूक विभागाचे वाहतूक निरीक्षक भावेश आमोणकर यांनी १२ व्या राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्ताने ह्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. दाबोळी विमानतळावर असलेल्या टॅक्सी चालकांना कशा पद्धतीने वाहतूक कायद्यांचे पालन करून वाहन चालवावे त्याची माहीती आहे. मात्र राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहा निमित्ताने त्यांच्यासाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करून वाहतूक कायद्याची पुन्हा एकदा उजळणी केली आहे.
रस्त्याचा उपयोग करणारे वाहन चालक असुद्या कींव्हा पादचारी त्यांनी स्व:ताच्या आणि दुसऱ्याच्या सुरक्षेसाठी वाहतूक कायद्याचे पालन करणे एकदम महत्वाचे आहे. राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने पुढच्या दिवसात आम्ही कॉलेज, विद्यालय इत्यादी ठीकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करून वाहतूक कायद्याचे पालन करणे का महत्वाचे आहे त्याबाबत माहीती पसरविणार असल्याचे भावेश आमोणकर यांनी सांगितले.
दाबोळी विमानतळावर आयोजित केलेल्या त्या कार्यक्रमावेळी वास्को वाहतूक खात्याचे निरीक्षक श्रीधर लोटलीकर, वाहतूक सहाय्यक निरीक्षक चतुर पार्सेकर, प्रभाकर खेडेकर, दर्शन परब आणि प्रजोत फडते उपस्थित होते. तसेच ह्या कार्यक्रमात युनायटेड युनियन टॅक्सीमेन असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश मयेकर, सरचिटणीस आंन्द्रे तावारीस, खजिनदार सर्वेश गावस इत्यादी मान्यवर उपस्थित होते.