आरजी ने स्विकारली २५ लाखांची देणगी; सोशल मीडियावरील अफवेविरोधात पोलिसांत तक्रार
By पूजा प्रभूगावकर | Published: May 1, 2024 05:29 PM2024-05-01T17:29:19+5:302024-05-01T17:30:28+5:30
रेव्होल्युशनरी गोवन्सने (आरजी) २०१९ साली २५ लाखांची रोख देणगी स्विकारली अशी अफवा सोशल मीडिया पोस्टद्वारे पसरवण्यात आली.
पूजा नाईक प्रभूगावकर,पणजी: रेव्होल्युशनरी गोवन्सने (आरजी) २०१९ साली २५ लाखांची रोख देणगी स्विकारली अशी अफवा सोशल मीडिया पोस्टद्वारे पसरवण्यात आली असून त्याविराेधात गोवापोलिसांच्या सायबर गुन्हे कक्षात तक्रार दाखल केल्याचे आमदार विरेश बोरकर यांनी सांगितले.
या तक्रारीत काही जणांची नावे नमूद केली असून त्यापैकी काहीजण हे कॉंग्रेससाठी काम करतात. त्यामुळे आरजी विरोधात ही अफवा कॉंग्रेसनेच पसरवल्याचा आम्हाला संशय आहे. लोकसभा निवडणूक प्रचारात आरजीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने कॉंग्रेस घाबरल्याने असून त्यातून हे सर्व करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
बोरकर म्हणाले, की आरजी पक्ष म्हणून दोन वर्षांपूर्वी नोंद झाला. मात्र त्यापूर्वी तो एनजीओ होता. आरजी एनजीओ असताना म्हणजेच २०१९ साली एका व्यक्तीने २५ लाख रुपये रोख देणगी दिल्याचे या सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले आहे. तसेच आरजीच्या नावाने बनावट पावती मनोज परब यांच्या फोटोसह सोशल मीडियावर शेअर केली आहे. आरजी पक्ष असो किंवा एनजीओ. आमचे सर्व आर्थिक व्यवहार हे पारदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.