भोमवासियांच्या न्यायासाठी आरजी प्रमुखांनी घेतली एसटी आयुक्तांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 04:57 PM2023-12-22T16:57:02+5:302023-12-22T16:57:37+5:30
लोकांना न्याय देण्यासाठी आरजी पक्षाचे प्रमुख मनोज परब भोमवासियांना घेउन एसटी आयुक्तांकडे धाव घेतली.
नारायण गावस,पणजी: बुधवारी भोम गावात राष्ट्रीय महामार्गच्या अभियंत्यांना सिमांकन करताना जाब विचारायला गेलेल्या भोमवासियांना बळजबरीने अटक करून कुळे पोलिस स्थानकात त्यांच्याशी अमानुषपणे वर्तन करण्यात आले. तसेच लाठी चार्ज करण्याची धमकीही देण्यात आली. याच्या निषेधार्थ या लोकांना न्याय देण्यासाठी आरजी पक्षाचे प्रमुख मनोज परब भोमवासियांना घेउन एसटी आयुक्तांकडे धाव घेतली. यावेळी आरजीचे आदिवासी संघटनेचे प्रमुख प्रेमानंद गावडे, दिनेश गावडे, अजय खोलकर उपस्थित होते.
आरजी प्रमुख मनोज परब म्हणाले जेव्हा राष्ट्रीय महामार्गचे अभियंते सिमांकन करण्यासाठी भोम गावात आले तेव्हा लोकांनी त्यांना फक्त कागद पत्रे व स्पष्टीकरण देण्यास सांगितले परंतु अधिकाऱ्यांकडे कोणतीच कागदपत्रे उपलब्ध नसल्यामुळे त्यांना काम बंद करण्याची विनंती केली. फक्त एवढ्याच कारणामुळे भोमवासियांना जबरदस्तीने अटक केली. हे सरकारी अधिकाऱ्यांनी केलेले कृत्य लज्जास्पद असून त्यांच्यावर कडक कार्यवाही झाली पाहिजे.
मनोज परब म्हणाले, आज जेव्हा भोमवासिय लोक आपली घरे, संसार उद्ध्वस्त होताना पाहत आहे, आणि ते वाचवण्यासाठी धडपड करीत आहेत. परंतु या सरकारला त्यांची पर्वा नसून त्यांना फक्त निवडणुकीसाठीची हे लोक हवे आहेत. स्वत:ला एसटी समाजाचा नेता, म्हणणारा हा प्रियोळ मतदारसंघाचा आमदार मंत्री गोविंद गावडे आता कुठे गेला आहे. आज एसटी समाजाच्या लोकांवर अन्याय होत असताना आता तो ह्या भोमवासियाना वाचविण्यासाठी त्यांचा संसार, त्यांची घरे वाचविण्यासाठी का पुढे येत नाही? हे सरकार हे गोवेकरासाठी नसून फक्त मोठ्या बिल्डर लॉबीसाठी असल्याचेही मनोज परब म्हणाले.
या भेटीदरम्यान एसटी आयुक्तांना त्यांनी स्वतः याची कडक कार्यवाही करून , घटनास्थळी पाहणी करून गावकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती मनोज परब यांनी केली असता, आम्ही स्वतः ह्याकडे गंभीरतेने लक्ष देणार असून, घटनास्थळी पाहणी करून, लोकांना न्याय देण्याचे काम करणार असल्याचे एसटी आयुक्त दीपक करमरकर यांनी सुद्धा सकारात्मक आश्वासन देत म्हटल्याचे मनोज परब यांनी माहिती दिली.