गोवा : आरजीची काँग्रेस आपसोबत युती नाहीच, आमदार विरेश बोरकरांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 04:26 PM2024-02-24T16:26:58+5:302024-02-24T16:27:52+5:30
आरजी पक्षाने आपले दोन्ही उमेदवार हे या अगोदरच जाहीर केले आहे.
नारायण गावस
पणजी: आरजी पक्षाने आपले दोन्ही उमेदवार हे या अगोदरच जाहीर केले आहे. त्यामुळे आता आमची इंडिया आघाडीबराेबर युती हाेण्याचा प्रश्नच नाही. आम्ही आमच्या पक्षातर्फे स्वतंत्र्य लोकसभा निवडणुका लढणार आहोत. त्यामुळे कॉँग्रेस आपने आम्हाला निवडणुकीत एकत्र येण्याचे आवाहन केले तरी आम्ही जाणार नाही, असे आरजीचे नेते व आमदार विरेश बोरकर यांनी सांगितले.
शनिवारी आपचे निमंत्रक ॲड. अमित पालेकर व कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दाेन्ही पक्ष इंडिया आघाडीअंतर्गत निवडणुक लढणार असे जाहीर केले. तसेच दाेन्ही जागांवर काँग्रेसचा उमेदवार असून आप पक्ष त्याला पाठिंबा देणार आहे. तसेच राज्यातील गोवा फॉरवर्ड, आरजी तसेच मगाे व अपक्ष उमेदवारांनी पाठिंबा देण्याचे आवाहन केले. पण आरजीने यात येण्यास नकार दिला आहे.
आमदार विरेश बोरकर म्हणाले, काँग्रेसच्या उमदेवारांनी विधानसभा निवडणुकीत निवडून येऊन पुन्हा भाजपात प्रवेश केला होता हे जनतेने पाहिले आहे. यापुढे त्यांचे उमेदवार असेच करु शकतात. अम्हाला या राष्ट्रीय पक्षांवर विश्वास नाही. आमचा स्थानिक पक्ष असून तसेच त्याला राज्य पक्ष म्हणून नाव मिळाले आहे. आम्ही ही निवडणूक स्वत: लढणार आहोत. गेल्या निवडणुकीत आपने तसेच कॉँग्रेसने आरजीवर मते फोडण्याचा आराेप केला होता. तरीही लोकांनी आम्हाला चांगला पाठिंबा दिला या निवडणुकीतही आम्हाला लोकांचा चांगला पाठिंबा मिळणार आहे.