'आरजी' लोकसभेच्या दोन्ही जागा लढवणार: मनोज परब
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 10:58 AM2023-05-28T10:58:02+5:302023-05-28T11:00:25+5:30
सांत आंद्रे मतदारसंघातील गोवा वेल्हा येथे आयोजित मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : रिव्होल्यूशनरी गोवन्स आगामी लोकसभानिवडणूक लढविणार असून दोन्ही मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचे पक्षाचे नेते मनोज परब यांनी जाहीर केले आहे. सांत आंद्रे मतदारसंघातील गोवा वेल्हा येथे काल आयोजित मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली.
जाहीर सभेत बोलताना परब म्हणाले, की रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाने गोमंतकीयांचा विश्वास जिंकला आहे आणि गोमंतकीयांच्या आमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत त्याची पुन्हा एकदा प्रचिती येणार आहे. आरजी लोकभेच्या दोन्ही जागा लढणार आहे, असे ते म्हणाले.
आरजी कुणा परप्रांतियांना गोव्यातून हाकलून लावण्यासाठी स्थापन झालेला पक्ष नाही. परंतु हा पक्ष गोमंतकीयांना त्यांचे हक्क मिळवून देणारा आहे. आमचा बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांना विरोध आहे. कर्नाटकात काँग्रेस सरकारने ३ हजार कोटी म्हादई वळविण्यासाठी ठेवले आहेत. गोव्यातील काँग्रेस पक्ष त्यावर काहीच बोलत नाही, असे परब यांनी सांगितले. यावेळी आमदार विरेश बोरकर आणि इतर आरजी नेत्यांची भाषणे झाली.
भाजपने म्हादई विकली आहे, हे सर्वांनी पाहिले आहे. काँग्रेस हा भाजपसाठी आमदार पुरविणारा पक्ष आहे. या पक्षाच्या चार नेत्यांची तोंडे चार दिशेने आहेत. सध्या त्यांचे पक्षांतर्गतच ऐकमेकांशी जुळत नाही ते गोवा एकसंध कसा ठेवणार. - मनोज परब, नेते, आरजी