मनोहर पर्रीकर-लोबो यांच्या मैत्रीला 10 वर्षात प्रथमच ग्रहण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 01:19 PM2018-10-08T13:19:49+5:302018-10-08T13:28:02+5:30
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि कळंगुटचे वादग्रस्त ठरलेले आमदार मायकल लोबो यांची सगळी कारकीर्द जरी वादांचीच असली तरी, पर्रीकर आणि लोबो यांच्यातील मैत्री मात्र ब-याच काळापासूनची आहे.
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि कळंगुटचे वादग्रस्त ठरलेले आमदार मायकल लोबो यांची सगळी कारकीर्द जरी वादांचीच असली तरी, पर्रीकर आणि लोबो यांच्यातील मैत्री मात्र ब-याच काळापासूनची आहे. लोबो यांनी आपल्या कारकीर्दीत प्रथमच मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यावर टीका केल्यामुळे स्वाभाविकपणे या दोन्ही नेत्यांमधील संबंधांना तडे गेल्याचे मानले जात आहे. पर्रीकर व लोबो यांच्यातील मैत्रीला ग्रहण कधी लागले तेच कळून आले नाही, अशा प्रकारची चर्चा भाजपाच्या आतिल गोटात सुरू आहे.
लोबो हे आमदार झाले तेव्हापासून विविध वाद निर्माण करण्याचे काम सुरू झाले पण लोबो यांची कळंगुटमधील लोकप्रियता गेल्या विधानसभा निवडणुकीपर्यत तरी कमी झाली नव्हती. कळंगुटमध्ये काही हजार ख्रिस्ती मतदार आहेत. तिथे 2012 सालापर्यंत कधीच भाजपाचा उमेदवार जिंकला नव्हता. लोबो हे भाजपच्या तिकिटावर दोनवेळा कळंगुटमध्ये जिंकले व पर्रीकर यांचा त्यामुळे लोबो यांच्यावर विश्वास वाढला.
लोबो यांनी भाजपावर व पर्रीकर यांच्यावर गेल्या आठवड्यात केलेली मोठी टीका ही भाजपाच्या कोअर टीमसाठी तापदायी ठरली. त्या अर्थाने भाजपाचे माजी आमदार विष्णू वाघ यांची जागा आता लोबो यांनी घेतलेली असल्याचे भाजपामधील अनेकांना वाटू लागले आहे. लोबो यांनी भाजपाची माफी मागायला हवी, अशी मागणी सोशल मीडियावरून काही भाजपा कार्यकर्ते करू लागले आहेत.
लोबो यांनी गोव्याचे प्रशासन ठप्प झालेय व हजारो युवक सरकारी नोक-यांपासून दूर राहिले यास पर्रीकर जबाबदार ठरतात अशा अर्थाची टीका गेल्या आठवड्यात केली होती. गोव्याचा खाणप्रश्न सुटत नसल्याने भाजपाच्या दोन्ही खासदारांनी पुन्हा निवडणूकच लढवू नये असेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतर मुख्यमंत्री पर्रीकर यांनी लोबो यांना दिल्लीत बोलावून घेतले व त्यांच्याशी चर्चा केली. पर्रीकर हे लोबो यांच्यावर नाराज झाले. पर्रीकर व लोबो यांच्यातील संबंधांमध्ये कटुता येण्याचा प्रकार गेल्या दहा वर्षात प्रथमच घडला आहे. आपण व पर्रीकर हे एकाच पर्रा गावचे आहोत. आपण दरवर्षी न चुकता गणोशोत्सवावेळी पर्रीकर यांच्या घरी जातो. भाजपाचा सदस्य नव्हतो, तेव्हाही आपण पर्रीकर यांच्या घरी जात असे, असे लोबो अनेकदा सांगतात. पर्रीकर हे केंद्रात संरक्षण मंत्री असतानाही लोबो अनेकदा दिल्लीत जाऊन पर्रीकर यांना भेटायचे. पर्रीकर यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी ते पर्रीकरांसोबत जेवणही घ्यायचे. पर्रीकर व लोबो यांच्यातील मैत्री ही अनेकदा चांगल्या अर्थाने गोव्यात चर्चेचा विषय ठरलेली आहे. मात्र आता दोघांचेही संबध वेगळ्य़ा वळणावर आले आहेत.
लोबो यांना भाजपामध्ये पर्रीकर यांनीच आणले होते. भाजपाला ख्रिस्ती उमेदवार जास्त संख्येने हवे असा विचार करून मुख्यमंत्री पर्रीकर यांनी लोबो, ग्लेन तिकलो, निलेश काब्राल, कालरुस आल्मेदा, स्वर्गीय माथानी साल्ढाणा यांना भाजपामध्ये आणले व हे सगळेजण भाजपच्या तिकिटावर जिंकले होते. एवढेच नव्हे तर फ्रान्सिस डिसोझा या ज्येष्ठ नेत्यालाही पर्रीकर यांनीच भाजपामध्ये आणले व डिसोझा हेही कायम भाजपाच्या तिकिटावर जिंकले. लोबो यांच्यासारखे आमदार म्हणजे भाजपचा ख्रिस्ती चेहरा ठरले. अशा आमदारांमुळे भाजपाच्या कमळाला गोव्यात ख्रिस्ती मते मिळण्यास मोठा हातभार लागला. मात्र लोबो हे सद्या मात्र भाजपच्या रोषास कारण ठरले आहेत.