भाजपाने घटक पक्षांना विश्वासात घेतले तरच योग्य भवितव्य : मगोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 12:46 PM2018-12-11T12:46:54+5:302018-12-11T12:56:24+5:30
गोव्यात देखील भाजपाने घटक पक्षांना विश्वासात घेऊन एकत्र काम केले तरच त्या पक्षाला योग्य भवितव्य असेल अशी प्रतिक्रिया माजी मंत्री व मगो पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी मंगळवारी व्यक्त केली.
पणजी - देशातील पाचपैकी दोन-तीन राज्यांमध्ये भाजपाच्या वाट्याला जी स्थिती आली, ते पाहता भाजपाने सत्तेतील घटक पक्षांना विश्वासात घेणे गरजेचे आहे हे स्पष्ट होते. गोव्यात देखील भाजपाने घटक पक्षांना विश्वासात घेऊन एकत्र काम केले तरच त्या पक्षाला योग्य भवितव्य असेल अशी प्रतिक्रिया माजी मंत्री व मगो पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी मंगळवारी व्यक्त केली.
गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणीत सत्ताधारी आघाडीचे मगोप आणि गोवा फॉरवर्ड हे दोन प्रमुख घटक आहेत. गोवा विधानसभा सध्या 38 सदस्यीय असून या दोन्ही पक्षांकडे एकूण सहा आमदार आहेत. भाजपाकडे चौदा व काँग्रेसकडेही चौदा आमदार आहेत. तिघे अपक्ष आहेत व त्या तीन अपक्षांपैकी दोन जण सध्या सरकारवर खूप नाराज आहेत. ते प्रशासन ठप्प झाल्याची टीकाही जाहीरपणे करतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव हे तूर्त काँग्रेसच्याबाजूने आहेत. गोव्यातील मगो पक्षाने यापूर्वी भाजपावरील दबाव वाढवला होता. मुख्यमंत्री आजारी असल्याने व ते घराबाहेर पडू शकत नसल्याने मुख्यमंत्रीपदाचा ताबा मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे सोपविला जावा, अशी मागणी मगो पक्षाने यापूर्वी सातत्याने केली होती. खनिज खाणी जर 15 डिसेंबपर्यंत सुरू झाल्या नाही तर मगोपला वेगळा विचार करावा लागेल असाही इशारा मगोपने दिला होता.
दोन-तीन राज्यांमध्ये भाजपाच्या वाट्याला जी स्थिती आली, त्याविषयी लोकमतने प्रतिक्रिया विचारताच अध्यक्ष दिपक ढवळीकर म्हणाले, की गोव्यातही घटक पक्षांना भाजपाने विश्वासात घेतले नाही तर ते मुळीच योग्य होणार नाही असा संदेश देशभरातील वातावरणामधून मिळत आहे. भाजपाने मनमानी कारभार बंद करावा. सरकार चांगल्या प्रकारे चालण्यासाठी भाजपाने घटक पक्षांना विश्वासात घ्यावे, तरच चांगले भवितव्य आहे हे आता अधिक स्पष्ट झाले आहे. मी जे काही बोलत होतो ते योग्य होते हेही आता कळून येत आहे. लोकांना गृहित धरता येत नाही.