तूर्त लोकसभेसाठी भूमिका नाही: वेलिंगकर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 11:06 PM2019-04-06T23:06:10+5:302019-04-06T23:07:36+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्याचे माजी संघचालक सुभाष वेलिंगकर यांचा गोवा सुरक्षा मंच पक्ष या लोकसभा निवडणुकीत कोणतीही भूमिका घेणार नाही.
- वासुदेव पागी
पणजी: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्याचे माजी संघचालक सुभाष वेलिंगकर यांचा गोवा सुरक्षा मंच पक्ष या लोकसभा निवडणुकीत कोणतीही भूमिका घेणार नाही. कुणाला मतदान करावे व कुणाला करू नये याचा निर्णय लोकांनी आपली सद्सद्विवेकबुद्धी वापरून घ्यायचा आहे, असे वेलिंगकर यांनी म्हटले आहे.
गोवा सुरक्षा मंच लोकसभा निवडणुकीत रिंगणात नाही, परंतु तिन्ही मतदारसंघात होऊ घातलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत हा पक्ष उतरला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत हा पक्ष नेमकी कोणती भूमिका बजावील, असे विचारले असता वेलिंगकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्ही उमेदवार ठेवलेले नाहीत. त्यामुळे भूमिका घेण्याचा प्रश्नच नाही. लोकांनीच आपली सद्सद्विवेकबुद्धी वापरून निर्णय घ्यायचा आहे.
विधानसभेच्या पोटनिवडणुका असल्यामुळे सर्व शक्ती ही त्यासाठी वापरली जाणार आहे. या निवडणुकीत चांगली कामगिरी करून दाखविली जाणार आहे. तसेच इतर सर्व मतदारसंघातही मंचाचे काम करायचे आहे. त्यासाठी पक्षसंघटना मजबूत करण्याचे काम केले जाणार आहे असेही त्यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. गोवा भाजपशी थेट लढा पुकारलेल्या या पक्षाने केंद्रात मात्र नरेंद्र मोदी सरकारच यावे असेही मागे म्हटले होते. शिवाय उत्तर गोव्याचे भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे गोवा सुरक्षा मंचातील कार्यकर्ते व नेते यांच्याशी चांगले संबंध आहेत. प्राथमिक शिक्षमाचे माद्यम मुद्यावर त्यांनी वेलिंगकर यांची भुमिका योग्य असल्याचेही अनेकवेळा जाहीररित्या म्हटले होते. त्यामुळे गोसुमची नाईक यांच्या बाबतीत काय भूमिका राहील या बाबत लोकांत उत्सुकताही होती. वेलिंगकर यांनी माद्यमाच्या मुद्यावरून भाजप सरकारशी लढा पुकारल्यानंतर संघाने त्यांना संघचालकपदावरून हटविले होते.