गोव्यातील जगप्रसिद्ध फेस्तावेळी धोका संभवतो, चर्चकडून शक्यता व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 07:50 PM2017-11-20T19:50:24+5:302017-11-20T19:50:48+5:30
राज्यात आता लवकरच सुरू होणार असलेल्या जगप्रसिद्ध सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्ताच्यावेळी धोका संभवतो, अशी भीती जुनेगोवे येथील बॉम जीझस बेसिलिका ह्या चर्चशी निगडीत धर्मगुरुंनी पुरातत्त्व खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांच्याशी सोमवारी झालेल्या बैठकीवेळी व्यक्त केली.
पणजी : राज्यात आता लवकरच सुरू होणार असलेल्या जगप्रसिद्ध सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्ताच्यावेळी धोका संभवतो, अशी भीती जुनेगोवे येथील बॉम जीझस बेसिलिका ह्या चर्चशी निगडीत धर्मगुरुंनी पुरातत्त्व खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांच्याशी सोमवारी झालेल्या बैठकीवेळी व्यक्त केली. यासाठी उपाययोजना करण्याच्यादृष्टीने आपण गृह मंत्री तथा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा करीन, अशी ग्वाही मंत्री सरदेसाई यांनी ख्रिस्ती धर्मगुरुंना दिली.
फेस्ताच्या ठिकाणी जगभरातून भाविक येत असतात. लाखोंच्या गर्दीमुळे धोका संभवतो, अशी शक्यता धर्मगुरुंनी व्यक्त केल्यानंतर मंत्री सरदेसाई यांनी हा विषय आपल्या खात्याच्या अखत्यारित येत नाही पण आपण मुख्यमंत्र्यांशी बोलेन असे सांगितले. फेस्ताच्या ठिकाणी येण्यासाठी व जाण्यासाठी असलेल्या मार्गाची संख्या कमी करायला हवी, या दृष्टीने विचार करता येईल पण एकदमच संख्या कमी केली तर, चेंगराचेंगरीही होऊ नये म्हणूनही काळजी घ्यावी लागेल, असे मंत्री सरदेसाई बैठकीनंतर बोलताना म्हणाले.
जुनेगोवे येथे ज्या जगप्रसिद्ध चर्चेस आहेत, त्या चर्च इमारतींच्या मधून पणजी- फोंडा हा मुख्य रस्ता (जुनेगोवेमार्गे) जातो. दोन्ही चर्चमधून हा रस्ता गांधी सर्कलकडे जातो. हा रस्ता दैनंदिन वाहतुकीसाठी कायमचा बंद करावा व रोज होणारी वाहतूक ही दुस:या मार्गाने वळवावी, अशीही मागणी ािस्ती धर्मगुरुंनी केली. या मागणीवर सरकार विचार करील, असे मंत्री सरदेसाई म्हणाले. या रस्त्यावरील वाहतुकीवर र्निबध लागू करता येतील. फक्त अतिमहनीय व्यक्ती वगैरे जेव्हा प्रवास करत असतात, त्यावेळीच रस्ता खुला करण्याच्यादृष्टीने विचार करता येईल, असे सरदेसाई म्हणाले.
जुनेगोवे येथे जवळच सेंट पॉल कॉलेजजवळ असलेल्या एका चॅपेलचे दुरुस्ती कामही आपले खाते लवकरच करून देईल. तसेच अन्य समस्या सोडविल्या जातील, असे मंत्री सरदेसाई यांनी लोकमतला सांगितले.
नोव्हेना 25 पासून
दरम्यान, सेंट झेवियर फेस्त हे गोंयच्या सायबाचे फेस्त म्हणून ओळखले जाते. देश-विदेशात स्थायिक झालेले ख्रिस्ती धर्मिय बांधव फेस्तानिमित्ताने गोव्यात येतात. फेस्त 4 डिसेंबर रोजी होईल. तथापि, तत्पूर्वी येत्या दि. 25 पासून नोव्हेना म्हणजेच पहाटेच्या प्रार्थना जुनेगोवे येथील चर्चमध्ये सुरू होणार आहेत.