IIT साठी रिवणची जागा, केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाचे काम पुढे नेणार - मुख्यमंत्री
By किशोर कुबल | Published: January 1, 2024 01:29 PM2024-01-01T13:29:20+5:302024-01-01T13:29:40+5:30
उच्च शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना इंटर्नशिपसाठी राज्य सरकारने आयआयटी, गोवा व बिटस् पिलानीकडे समझोता करार केला.
पणजी : आयआयटीसाठी रिवण येथे जागा सूचवली असून केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाचे काम पुढे नेले जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
उच्च शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना इंटर्नशिपसाठी राज्य सरकारने आयआयटी, गोवा व बिटस् पिलानीकडे समझोता करार केला. या करारावर सह्या झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील भाष्य केले. आयआयटी, गोवाचे संचालकही याप्रसंगी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, आयआयटीसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकाय्रांना आम्ही रिवण येथील जागा दाखवली आहे. अधिकाय्रांनी जागेच पाहणीही केली आहे.’ सध्या आयआयटी फर्मागुढी येथे कार्यरत आहे. रिवण येथे कायमस्वरुपी व्यवस्था म्हणून १० लाख चौरस मिटर जमीन सरकारने या प्रकल्पासाठी सूचवली आहे.
दरम्यान, आयआयटी, गोवा व बिटस् पिलानीकडे केलेल्या समझोता कराराबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी अशी माहिती दिली की, ‘ आयआयटी, गोवाकडून कम्प्युटर सायन्स, फिजिक्स व मॅथेमेटिक्स तर बिटस् पिलानीकडून कम्प्युटर सायन्स या विषयातील प्रशिक्षण शिक्षकांना मिळणार आहे.
उच्च शिक्षण देणाय्रा शिक्षकांसाठी शिखर संस्थांकडून अशा प्रकारची इंटर्नशिप उपलब्ध करण्याचा हा उपक्रम सुरु करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. उच्च शिक्षण देणाय्रा सरकारी तसेच खाजगी संस्थामध्ये विद्यादानाचे काम करणाय्रा शिक्षकांनी याचा फायदा घ्यावा.
सहा महिने किंवा एक वर्ष कालावधीचा ही इंटर्नशिप असेल. शिक्षकांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळणार असल्याने त्याचा दीर्घकालीन फायदा विद्यार्थांनाही होणार आहे.