गोव्यात शालेय अभ्यासक्रमात रस्ता सुरक्षा विषय लागू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 08:18 PM2018-01-08T20:18:26+5:302018-01-08T20:18:35+5:30
शालेय अभ्यासक्रमात रस्ता सुरक्षा विषय लागू करण्याचा तसेच 2020पर्यंत रस्ता अपघात निम्म्यावर आणण्यासाठी युद्धपातळीवर कृती योजना तयार करण्याचा निर्णय सोमवारी रस्ता सुरक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
पणजी : शालेय अभ्यासक्रमात रस्ता सुरक्षा विषय लागू करण्याचा तसेच 2020पर्यंत रस्ता अपघात निम्म्यावर आणण्यासाठी युद्धपातळीवर कृती योजना तयार करण्याचा निर्णय सोमवारी रस्ता सुरक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
रस्ता सुरक्षा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम शिक्षण खात्याकडून चालू आहे. एससीईआरटीने मसुदा तयार केला आहे. त्यासाठी वाहतूक पोलीस तसेच तज्ज्ञांकडून सल्ला घेण्यात आला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा विषय लागू होणार आहे. वाहतूक नियमांचा भंग करणा-यांवर कडक कारवाई करण्याचे तसेच रस्ता सुरक्षा विषयक नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत, याची खबरदारी घेण्याचे ठरले.
वाढत्या रस्ता अपघातांबद्दल बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. इंटरसेप्टर्स, अल्कोमीटर आदी उपकरणे खरेदी करण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे. सुरळीत वाहतुकीच्या दृष्टीने रस्त्यांवर ज्या ज्या ठिकाणी दिशाफलक किंवा इतर गोष्टींची आवश्यकता त्याबाबत प्रस्ताव सादर करण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याला सांगण्यात आले आहे.
महत्त्वाच्या तसेच शहरांमधील रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंगचे पेंटिंग केले जाईल. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडून आर्थिक साहाय्य घेऊन उत्तर आणि दक्षिण गोव्यात आवश्यक त्या ठिकाणी ट्रॉमा युनिट उघडण्याच्या बाबतीत आरोग्य खात्याकडूनही प्रस्ताव मागविला आहे.
रस्त्यावरील भटक्या गुरांमुळे वाहनधारकांना निर्माण झालेल्या धोका यावरही चर्चा करण्यात आली. भटक्या गुरांना पकडून त्यांची कोंडवाड्यात रवानगी करण्याचेही बैठकीत ठरले. वेगवेगळ्या घटकांना सोबत घेऊन रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. वाहतूक खाते, पोलीस दल, आरोग्य खाते, सार्वजनक बांधकाम खाते यांच्या संयुक्त विद्यमाने चालू महिनाअखेर रस्ता सुरक्षा सप्ताह होणार आहे.