मुसळधार पावसामुळे गोव्यात नद्यांना पूर; वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 06:55 PM2019-10-25T18:55:16+5:302019-10-25T18:55:55+5:30

चंद्रनाथ पर्वतावर विद्यार्थी अडकले

ROADS SUBMERGE UNDER WATER IN GOA DUE TO HEAVY RAINS | मुसळधार पावसामुळे गोव्यात नद्यांना पूर; वाहतूक विस्कळीत

मुसळधार पावसामुळे गोव्यात नद्यांना पूर; वाहतूक विस्कळीत

googlenewsNext

मडगाव: गुरुवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पारोडा—केपे येथील कुशावती नदीला पूर आल्याने पर्वत पारोड्याजवळील रस्ता पाण्याखाली गेला. यामुळे मडगाव—सांगे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. यंदा या नदीला सहाव्यांदा पूर आला असून अलिकडच्या काळातील एवढ्या मोठ्या प्रमाणावर पूर येण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे.

कुशावती नदीचे पाणी वाढल्याने सकाळी 10 च्या सुमारास हा रस्ता पाण्याखाली गेला. यामुळे या रस्त्यावरुन जाणारी वाहतूक चांदरमार्गे वळविण्यात आली. मात्र चांदर येथेही एक वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक अडून उरली. सायंकाळी उशिरापर्यंत हा रस्ता पाण्याखाली असल्याने या मार्गावरील पूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती.

वादळी वाऱ्याने चंद्रेश्र्वर पर्वतावरील रस्त्यावर एक झाड उन्मळून पडल्याने विद्यार्थ्यांचा एक गट पर्वतावरच अडकून पडण्याची घटना घडली. चंद्रेश्र्वर पर्वतावर पणजीतील एका विद्यालयाचे एनएसएस शिबीर आयोजित करण्यात आले होते. शुक्रवारी हे विद्यार्थी पुन्हा आपल्या घरी जाणार होते. मात्र वाटेत झाड उन्मळून पडल्याने ते अडकले. शेवटी मडगावच्या अग्नीशमन दलाच्या जवानांनी हे झाड कापून विद्यार्थ्यांना रस्ता मोकळा करुन दिला. केपे परिसरात कुशावतीचे पाणी वाढल्याने दत्त मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत नदीचे पाणी पोहोचले होते.

रस्ते पाण्याखाली; झाडे कोसळण्याच्याही घटना
धुवांधार पावसाने शुक्रवारी संपूर्ण सासष्टी तालुक्याला झोडपून काढले. पावसाबरोबरच आलेल्या वादळी वा:यामुळे या तालुक्यात 50 पेक्षा जास्त ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या असून ही झाडे कापून मार्ग मोकळे करण्यासाठी संपूर्ण दिवस अग्नीशमन दलाचे जवान व्यस्त होते. विशेषत: किनारपट्टी भागात झाडे पडण्याच्या घटना अधिक घडल्याची माहिती अग्नीशमन दलाच्या सूत्रांनी दिली.
गुरुवारी रात्रीपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे शुक्रवारी मडगावातही रस्त्यावर पाणी आले होते. मडगाव पालिकेसमोर पाणी साचल्याने पादचाऱ्यांना पाण्यातून वाट काढत जावे लागत होते. विद्यानगर भागात शुक्रवारी सकाळी एक वृक्ष उन्मळून पडल्याने दोन स्कूटरचे किरकोळ नुकसान झाले अशी माहिती स्थानिक नगरसेविका सुगंधा बांदेकर यांनी दिली. त्या म्हणाल्या, या भागात धोकादायक स्थितीत असलेले हे झाड सकाळी उन्मळून पडले. नशिबाची बाब म्हणजे नेहमी या जागेत दोन कार पार्क करुन ठेवल्या जातात. मात्र त्यापैकी एक गाडी पार्क केली नव्हती तर दुसरी गाडी झाड पडण्याच्या पाच मिनटापूर्वीच तेथून हटविल्याने मोठा अनर्थ टळला असे त्या म्हणाल्या. या भागात आणखीही धोकादायक स्थितीत झाडे आहेत ती लवकर हटवावीत अशी मागणीही त्यांनी केली.

बेपत्ता खलाशाचा शोध चालूच
मोबोर—बेतूल येथे गुरुवारी मच्छीमारी होडी फुटून झालेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेला वासू नावाचा तांडेल शुक्रवारीही सापडला नाही. मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असतानाही तटरक्षक दलाकडून त्याचा शोध घेणो चालू होते. गुरुवारच्या या दुर्घटनेत एकूण पाचजण पाण्यात फेकले गेले होते. त्यातील चारजणांना सुरळीतपणे काठावर आणले. मात्र होडीचा तांडेल लाटाबरोबर बेपत्ता झाला होता. शुक्रवारी संपूर्ण समुद्र खवळून निघाल्याने मच्छीमारी होड्या काठावर ठेवणोच पसंत केले. लाटांच्या तडाख्याने दक्षिण गोव्यातील कित्येक किनारपट्टींची मोठ्या प्रमाणावर झीज झाली आहे.
 

Web Title: ROADS SUBMERGE UNDER WATER IN GOA DUE TO HEAVY RAINS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस