मराठ्यांची गर्जना; विविध समाज गट अधिक सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 08:51 AM2023-11-01T08:51:07+5:302023-11-01T08:52:20+5:30
लोकप्रतिनिधी खूप जबाबदार असावे लागतात.
अलीकडे विविध समाज गट गोव्यात अधिक सक्रिय होऊ लागले आहेत. आपल्या जातीचे, समाजाचे अधिकाधिक उमेदवार निवडून येऊन विधानसभेत पोहोचायला हवेत, असे राजकारण्यांना वाटतेच, शिवाय लोकांमधीलही एका वर्गाला तसेच वाटू लागले आहे. कुंभारजुवे मतदारसंघातील भाजपचे आमदार राजेश फळदेसाई हे अतिउत्साही राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी गोव्यात क्षत्रिय मराठा समाजातील आमदारांचा आकडा सातवरून चौदापर्यंत वाढू शकतो, असे विधान परवा केले. यापूर्वी मराठा समाजातील कोणत्याच आमदाराने कधी असे धाडस केले नव्हते. फळदेसाई जे काही बोलले ते फार गंभीरपणे घ्यावे अशी स्थिती नाही. तरीदेखील सत्ताधारी भाजपचा आमदार असे विधान करतो तेव्हा त्यावर थोडा ऊहापोह व्हायला हवा.
लोकप्रतिनिधी खूप जबाबदार असावे लागतात. गोव्याला गेल्या वीस वर्षांत काही लोकप्रतिनिधी काहीसे उथळ लाभले. पूर्वी मिकी पारोको, बाबूश मोन्सेरात वगैरे वाट्टेल ती विधाने करायचे मग बाबू आजगावकरांसारखे राजकारणीही मागचापुढचा विचार न करता बोलू लागले. पर्रीकर मुख्यमंत्रिपदी असताना कॅबिनेट बैठकीत एका मंत्र्याने दुसऱ्या ज्येष्ठ मंत्र्याला चक्क शिवीगाळ केली होती. पर्रीकर तेव्हा खूप आजारी, त्यामुळे हबतल, असाहाय्य होऊन गप्प राहिले होते. फळदेसाई तसे आमदार मुळीच नाहीत. मात्र उत्साहाच्या भरात काहीवेळा जे काही बोलून जातात, ते जबाबदार लोकप्रतिनिधींच्या परंपरेस धरून नाही. कुंभारजुवेतही एक सनबर्न व्हायला हवा, अशी अपेक्षा काही महिन्यांपूर्वी फळदेसाई यांनी सरकारी कार्यक्रमावेळी व्यक्त केली होती. त्यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे व्यासपीठावर होते.
किनारी भागात होणारा सनबर्न महोत्सव आपल्या मतदारसंघातही व्हावा, छोटा तरी सनबर्न हवाच, असे विधान त्यांनी केले होते. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर फळदेसाई भाजपमध्ये जाण्यास उतावीळ झाले होते. शेवटी त्यांनी भाजपमध्ये उडी टाकलीच. कदाचित पुढे ते भाजपला जड होऊ शकतात, असे त्यांच्या विधानांवरून कधी कधी वाटू लागते. आमदारांना आपल्या समाजाच्या पलीकडे जाऊनही विचार करावा. लागतो, हे भविष्यात अनुभवाअंती फळदेसाई यांना कळून येईलच. विद्यमान मुख्यमंत्री सावंत हे परिपक्व आहेत. ते कधी असे बोलत नाहीत. ही परिपक्वता फळदेसाई यांनाही दाखवावी लागेल. क्षत्रिय मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच झाला. फळदेसाई त्यावेळी म्हणाले की, क्षत्रिय मराठा समाज
बांधवांची प्रगती होत आहे.
भविष्यात या समाजातील आमदारांचा आकडा सातवरून चौदापर्यंत पोहोचेल. फळदेसाई यांनी हा निष्कर्ष काढण्यापूर्वी खूप विचार केलाय किंवा अभ्यास केलाय असे वाटत नाही. यापूर्वी मराठा समाजातीलच प्रतापसिंह राणे, पार्सेकर आदी अनेकांनी मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. विद्यमान मुख्यमंत्रीही मराठा समाजातीलच आहेत. मात्र, चाळीस सदस्यीय विधानसभेत मराठा आमदारांची संख्या सातवरून चौदापर्यंत पोहोचेल, अशा अर्थाचे विधान कधी राणे, पार्सेकर यांनीही केले नव्हते किंवा सावंत यांनीही केले नाही. विधान करायलाही हरकत नाही, पण मराठा समाजातील आमदारांची संख्या वाढविण्यासाठी तुम्ही स्वतः कोणते योगदान देत आहात, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट अशी की मराठा समाजातील किंवा कुण्या एका समाजातील आमदारांची संख्या वाढवून नेमके काय साध्य केले जाणार आहे?
गोव्याला चांगले, कार्यक्षम, सुशिक्षित आमदार हवे आहेत. मग ते कोणत्याही समाजातील असो, मराठा समाजाविषयी सर्वांनाच अभिमान आहे, आपुलकी आहे. कारण गोवा मुक्तिसंग्रामातदेखील या समाजाने इतरांप्रमाणेच लक्षणीय योगदान दिले आहे. मात्र, आजचा काळ वेगळा आहे. अमक्याच एका समाजाचे आमदार दुप्पट होतील असे बोलण्यासारखी स्थिती आज राहिलेली नाही. तसे झाले तर मग भंडारी समाज, खारवी समाज वगैरे विविध समाजातील आमदार म्हणू लागतील की, आमच्याच समाजातील आमदारांची संख्या वाढावी. तसे केल्याने भेदाभेद वाढू शकतो. हा धोका येथे अधोरेखित करावा एवढाच हेतू आहे. बाकी फळदेसाई यांनी बोलून गुन्हा केला असे कुणीच म्हणत नाही व म्हणणारही नाही.