मडगावातील व्यापाऱ्याच्या घरात चोरी प्रकरणी महिला ताब्यात; 60 लाखांचा ऐवज जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 05:52 PM2019-04-04T17:52:37+5:302019-04-04T17:53:34+5:30
सिल्वर फॉईलमध्ये लपवून ठेवलेले दागिने जप्त
मडगाव: मडगावातील प्रसिद्ध व्यापारी असलेले दास नाईक यांच्या आगाळी - फातोर्डा येथील बंगल्यात शिरुन सुमारे 60 लाखाचे दागिने आणि रोख रक्कम पळविल्याच्या गुन्हय़ाखाली फातोर्डा पोलिसांनी शांतीनगर-रावणफोंड येथील सिल्वीना फर्नाडिस या महिलेला अटक करुन तिच्याकडून चोरीचा ऐवज जप्त केला आहे. सदर दागिने या संशयित महिलेने एका सिल्वर फॉईलमध्ये बांधून बोर्डा येथील आपल्या आईच्या घरी लपवून ठेवले होते अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
या प्रकरणात नाईक यांच्या बंगल्याच्या वरच्या बाजूला भाडेकरु म्हणून रहाणारे मनोहर प्रभूदेसाई व त्याची पत्नी लीना प्रभूदेसाई यांचाही हात असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून पोलिसांनी या दाम्पत्याच्या मालकीची एक स्कुटरही जप्त केली आहे. या प्रकरणात आपल्याला अटक होईल या भीतीने या संशयित दाम्पत्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून या प्रकरणात तक्रारदार नाईक यांच्यावतीने अॅड. राजीव गोमीस यांनी तक्रारदाराचीही बाजू ऐकून घेण्यासाठी हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. सदर दाम्पत्य सध्या फरारी आहे.
फातोर्डा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, 27 मार्च रोजी रात्री 7.45 वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाली होती. आगाळी येथील सेंट अँथनी कम्युनिटी हॉलच्या मागे असलेल्या नाईक यांच्या बंगल्यात सदर संशयित मागच्याबाजूने आत शिरली. यावेळी नाईक यांचा मुलगा बाथरुममध्ये आंघोळ करत होता. त्यामुळे घराचे मागचे दार उघडे होते. याच उघडय़ा दारातून संशयित महिलेने आत येऊन सुमारे 60 ते 65 लाखांचे सोन्याचे दागिने तसेच सुमारे दोन लाखांचे देशी व विदेशी चलन चोरुन नेले.
या प्रकरणात त्या संशयित महिलेला 1 एप्रिल रोजी संशयावरुन अटक केली होती. मात्र तब्बल दोन दिवस तिने आपले तोंड न उघडल्याने या चोरीचा छडा लागू शकला नव्हता. शेवटी बुधवारी तिने आपले तोंड उघडले. चोरलेले सामान आपण प्रभुदेसाई याच्या मदतीने त्याच्या स्कुटरवरुन दुसरीकडे नेऊन ठेवल्याचेही तिने तपासाच्यावेळी पोलिसांना सांगितल्यामुळे पोलिसांनी प्रभूदेसाई यांच्या मालकीची स्कुटर जप्त केली.
या प्रकरणात मडगावचे पोलीस उपअधीक्षक सेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली फातोडर्य़ाचे निरीक्षक सलीम शेख, उपनिरीक्षक अनंत गावकर, साईल वारंग, महिला उपनिरीक्षक सुमेधा नाईक, पोलीस शिपाई रोहन नाईक, सुधीर तळेकर, महिला पोलीस शिपाई अनिता राणो, प्रियांका, शैनाज देसाई व इतर कर्मचा:यांनी भाग घेतला.