रोहन खंवटे यांनी मागितली श्रीपादभाऊंची माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 02:33 PM2023-02-28T14:33:44+5:302023-02-28T14:35:14+5:30
दोनापावला जेटी उद्घाटनाच्या कार्यक्रमास डावलल्याचे प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दोनापावला जेटी उद्घाटन कार्यक्रमास केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना निमंत्रण दिले गेले नाही, हा निष्काळजीपणा असल्याचे मान्य करत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी जाहीर माफी मागितली आहे. यापुढे अशा प्रकाराची पुनरावृत्ती घडणार नाही, असे ते म्हणाले.
शिगमोत्सवाच्या पत्रकार परिषदेच्यावेळी पत्रकारांनी श्रीपादभाऊंच्या नाराजीबद्दल विचारले असता खंवटे म्हणाले की, श्रीपाद नाईक हे केंद्रात पर्यटन राज्यमंत्री आहेत. निमंत्रण न मिळाल्याने त्यांनी व्यक्त केलेला रोष स्वाभाविक आहे. असा निष्काळजीपणा घडायला नको होता. श्रीपाद नाईक यांना मी त्याच दिवशी भेटून घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरीही व्यक्त केलेली आहे. असा प्रकार यापुढे घडणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल.
दरम्यान, श्रीपाद यांनी रविवारी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून मुद्दामहून आपल्याला कार्यक्रमांना डावलले जात असल्याचा आरोप केला होता. मुख्यमंत्री तसेच मंत्र्यांनी यात लक्ष घालावे, असे आवाहन त्यांनी केला होता. १७ कोटी रुपये खर्च करुन नूतनीकरण केलेल्या दोनापावला जेटीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करून स्वदेश दर्शन योजनेखाली आपण निधी आणल्याचे श्रीपाद यांचे म्हणणे होते. एखाद्या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून निधी मिळतो तेव्हा केंद्राच्या प्रतिनिधीला कार्यक्रमाला बोलावणे अपेक्षित असते. उत्तर गोव्याचा खासदार या नात्यानेही आपल्याला निमंत्रण द्यायला हवे, असे श्रीपाद यांचे म्हणणे आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"