रोहित मोन्सेरात चौथ्यांदा पणजी महापालिकेचे महापौर तर संजीव नाईक तिसऱ्यांदा उपमहापौरपदी!
By पूजा प्रभूगावकर | Published: March 27, 2024 02:02 PM2024-03-27T14:02:56+5:302024-03-27T14:04:08+5:30
मनपाच्या विशेष बैठकीत आयुक्त क्लेन मदेरा यांनी या दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे केले जाहीर
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी-गोवा: महापौर व उपमहापौरपदी पुन्हा रोहित मोन्सेरात व संजीव नाईक यांच्या नावांची बुधवारी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मोन्सेरात हे चौथ्यांदा तर नाईक हे तिसऱ्यांदा उपमहापौर बनले आहेत. मनपाच्या बुधवारी सकाळी झालेल्या विशेष बैठकीत आयुक्त क्लेन मदेरा यांनी महापौरपदी रोहित मोन्सेरात व उपमहापौरपदी संजीव नाईक यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. या दोघांचे यावेळी उपस्थित नगरसेवकांनी अभिनंदन केले. मात्र या बैठकीला विरोधी नगरसेवकांसह काही सत्ताधारी नगरसेवकांची अनुपस्थितीत प्रकर्षाने जाणवली.
महापौर म्हणाले, की पणजी मनपा सध्या जी कुठलीही कामे सुरु आहेत, त्यावर भर दिला जात आहे. मनपाच्या नव्या इमारतीचे काम सध्या आहे. याशिवाय शहरात मान्सूनपूर्व कामेही हाती घेतली आहेत. पावसाळ्यात दरवर्षी पणजीत पुर:सदृष्य स्थिती निर्माण होते. मात्र मागील वर्षापासून मनपाच्या प्रयत्नांमुळे पावसाळ्यात शहरात पाणी भरणे, पुर:सदृष्य स्थिती निर्माण होणे असे होत नाही. यंदाही त्यादिशेने काम सुरु आहे. प्रभागवार ही कामे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.