ज्येष्ठांची धावाधाव
By admin | Published: April 22, 2015 01:43 AM2015-04-22T01:43:15+5:302015-04-22T01:43:30+5:30
पणजी : दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ सुरूच राहावा म्हणून आपण जिवंत असल्याचा दाखला सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सादर करणे
पणजी : दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ सुरूच राहावा म्हणून आपण जिवंत असल्याचा दाखला सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सादर करणे सरकारने बंधनकारक केले आहे. तथापि, त्यासाठीची व्यवस्थाच नीट नसल्याने प्रचंड गोंधळ उडाला असून दाखले सादर करण्यासाठी झुंबड उडू लागली आहे. रोज शेकडो दाखल्यांवर सह्या करून विविध पक्षांचे आमदारही वैतागले आहेत.
दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थींची एकूण संख्या सव्वालाखापेक्षा जास्त आहे. अगोदरच अलीकडे लाभार्थींना वेळेवर पैसे मिळत नाहीत. तीन-चार महिन्यांनी एकदा त्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. योजनेचे लाभार्थी हे विविध वयोगटांतील ज्येष्ठ नागरिक आहेत. ७0 ते ८५ वयोगटातील हजारो लाभार्थी आहेत. आता या योजनेचा लाभ सुरू राहावा म्हणून हयातीचा दाखला सादर करण्यासाठी या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अगोदर समाजकल्याण खात्याकडे जाऊन मंजुरी क्रमांक मिळवावा लागतो. मग दाखल्यासाठी आमदाराची सही घ्यावी लागते. समाजकल्याण खात्यात व विविध आमदारांकडे ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागत आहेत. अनेक नागरिक आजारी आहेत. त्यांना घराबाहेर पडणेही शक्य होत नाही. पर्वरीचे आमदार रोहन खंवटे तसेच फोंड्याचे आमदार लवू मामलेदार यांनीही या व्यवस्थेत सरकारने सुधारणा करून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली.
(खास प्रतिनिधी)