१७ जागांवर रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2017 02:14 AM2017-02-01T02:14:04+5:302017-02-01T02:14:04+5:30

पणजी : येत्या ४ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असतानाच ४0पैकी १७

Rope pick up 17 seats | १७ जागांवर रस्सीखेच

१७ जागांवर रस्सीखेच

Next

पणजी : येत्या ४ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असतानाच ४0पैकी १७ मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत. गड राखण्यासाठी काही प्रस्थापितांचा संघर्षही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता उद्या गुरुवारी होत आहे.
एकूण २५१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. राज्यातील ११ लाख १० हजार मतदार येत्या शनिवारी या उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. काही मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढती होतील, तर १0 मतदारसंघांमध्ये थेट लढती होणार आहेत. शेवटच्या टप्प्यात निवडणूक प्रचाराला जोर चढला आहे. १७ मतदारसंघांमध्ये कोण जिंकेल व कोण हरेल ते सांगता येत नाही, अशी स्थिती आहे. भाजपतर्फे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी २00पेक्षा जास्त कोपरा बैठका ३६ मतदारसंघांमध्ये घेतल्या. शिवाय प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, उपाध्यक्ष दत्ता खोलकर यांनी भाजपचा प्रचार सांभाळला. काँग्रेसतर्फे प्रतापसिंग राणे, दिगंबर कामत व लुईझिन फालेरो यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. मगोपतर्फे सुदिन ढवळीकर, तर गोवा सुरक्षा मंचतर्फे आनंद शिरोडकर व सुभाष वेलिंगकर यांनी बैठका घेतल्या. शिवसेनेतर्फे खासदार संजय राऊत यांनी धुरा सांभाळली. विरोधी व सत्तेतील बहुतांश उमेदवारांनी घरोघर प्रचार केला, तेव्हा लोकांनी नोकरीचीच अपेक्षा व्यक्त केली.
निवडणूक आयोगाने आपली यंत्रणा अतिशय सक्रिय केली आहे. रात्रीच्यावेळी मतदारांना पैसे किंवा भेटवस्तू वाटण्याचे प्रकार घडू नयेत म्हणून फिरती पथके सर्वत्र फिरत आहेत. शिवाय प्रमुख मार्गांवर पोलिसांकडून नाकाबंदीही सुरू आहे. काही भागांत लाखो रुपयांची दारू पकडली गेली आहे. दोन ठिकाणी रोख रक्कम पकडली गेली. वाणिज्य कर खात्याने तर गेल्या पाच दिवसांत १00पेक्षा जास्त मालवाहू वाहने तपास नाक्यांवर ताब्यात घेतली आहेत.
माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री दीपक ढवळीकर, मंत्री राजेंद्र आर्लेकर, मंत्री महादेव नाईक, दयानंद मांद्रेकर, दिलीप परुळेकर, मिलिंद नाईक, आवेर्तान फुर्तादो, अ‍ॅलिना साल्ढाणा, आमदार जेनिफर मोन्सेरात, सिद्धार्थ कुंकळयेकर, बाबूश मोन्सेरात, माविन गुदिन्हो, राजन नाईक, गणेश गावकर, सुभाष फळदेसाई यांच्याकडून लढविल्या जात असलेल्या मतदारसंघांमध्ये निवडणुकीचा निकाल कसा लागेल, याकडे मतदारांचे लक्ष आहे. पर्वरी, कळंगुट, सांताक्रुझ, सांत आंद्रे, काणकोण, वेळ्ळी, मये, पर्ये या मतदारसंघांतील लढतीकडेही लोकांचे लक्ष आहे; कारण तिथेही काही प्रमाणात चुरस आहे.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Rope pick up 17 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.