अरेरे! किडलेला तांदूळ जातोय लोकांच्या घशात; मुरगाव तालुका नागरीपुरवठा कार्यालयाच्या गोदामात प्रकार
By पंकज शेट्ये | Published: May 10, 2023 03:25 PM2023-05-10T15:25:20+5:302023-05-10T15:26:30+5:30
संबंधित खाते खडबडून जागे झाले आहे.
पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क वास्को : नागरीपुरवठा खात्याच्या गोदामातील धान्य सडण्याचे प्रकरण ताजे असताना आता मुरगाव तालुक्यातील नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातून आणलेल्या तांदळात अक्षरश: अळ्या सापडल्या आहेत. स्वस्त रेशन धान्य दुकानदारांनी गोदामातून आणलेला तांदूळ काही रेशन कार्डधारकांना देत असताना हा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर धान्याचे वाटप थांबवण्यात आले असून संबंधित खाते खडबडून जागे झाले आहे.
मुरगाव तालुक्यात ४१ स्वस्त धान्य दुकानदार आहेत. तालुक्यातील रेशन कार्डधारकांना या महिन्याचा तांदूळ पुरवण्यासाठी २० ते २५ धान्य दुकानदारांनी नागरी पुरवठा 3 खात्याच्या गोदामातून तांदळाचा साठा उचलला. ज्यांनी हा तांदूळ नेला आहे, त्यापैकी अनेकांना सडलेला तसेच अळ्या झालेला तांदूळ मिळाला आहे. या प्रकारामुळे धान्य दुकानदारांबरोबर रेशन कार्डधारकांनीही संताप व्यक्त केला आहे.
याबाबत मुरगाव तालुका नागरीपुरवठा विभागाच्या निरीक्षक सरिता मोरजकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या की, स्वस्थ धान्य दुकानदारांनी नेलेल्या साठ्यातील तांदूळ सडल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी नागरी पुरवठा संचालकांशी चर्चा करण्यात आली आहे. निकृष्ठ दर्जाचा तांदूळ दुकानदारांना बदलून देण्यात येणार आहे.
आमच्या गोदामात फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल असा तीन महिन्यांचा तांदळाचा साठा करण्यात आला आहे. मागील महिन्यात काही जणांचे रेशन कार्ड निलंबित झाल्याने साठा कमी प्रमाणात नेण्यात आला होता. हा तांदूळ कशामुळे खराब झाला याची चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अळ्या झाल्या कशा?
नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातून आणलेल्या तांदळाच्या साठ्यात अळ्या झाल्याच कशा? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. गोदामातील धान्य सडण्याचे प्रकार थांबत नाहीत. त्यात आता मुरगाव तालुक्यातील साठ्यात अळ्या झाल्याने सामान्यांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, ते निरुत्तर झाले.
धान्य सडण्याचे प्रकार नवीन नाही
गोदामांमध्ये धान्य सडण्याचे प्रकार नवीन नाहीत. कोविड काळात रेशनवर वितरणासाठी आणलेली तब्बल २४२ मैट्रिक टन तूरडाळ सडली. याची किंमत सुमारे २ कोटी रुपये होती. हे प्रकरण दक्षता खात्याकडे चौकशीसाठी गेले. त्यानंतर १० मेट्रिक टन साखर गोदामात वितळली. हे प्रकरणही गाजले. मध्यंतरी नागरी पुरवठा खात्याच्या गोदामांमधून धान्य तस्करीचे प्रकरणही गाजले.
सोशल मीडियावर फोटो व्हायरल
मुरगाव तालुक्यातील स्वस्थ धान्य दुकानदारांच्या व्हॉट्सअॅप ग्रुप गोदामातून आणलेला तांदूळ निकृष्ठ असल्याची चर्चा सुरु झाली. अनेकांनी फोटो, व्हिडीओ शेअर केले. त्यानंतर मुरगावात याबाबतच्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण पसरले आहे.
कुठ्ठाळी येथील गोदामात वेळोवेळी 'पेस्ट कंट्रोल करण्यात येत आहे. तरीही घडलेल्या ' या प्रकाराची योग्य चौकशी केली जाईल. अनेकांनी आम्हाला सडलेल्या तांदळाचे फोटो, व्हिडीओ पाठवले आहेत. दुकानदारांना साठा बदलून देण्यात येणार आहे. -सरिता मोरजकर, निरीक्षक, मुरगाव तालुका नागरी पुरवठा विभाग