गोव्यात एका फुटबॉल सामन्यासाठी पोलीस सुरक्षेवर 31 लाखांचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 06:27 PM2018-11-15T18:27:26+5:302018-11-15T18:27:47+5:30
एफसी गोवा फॅन क्लबचा सदस्य लेस्टर फर्नाडिस याला मारहाण केल्यामुळे एफसी गोवा क्लबसाठी काही प्रमाणात महागडी ठरलेली गोवा पोलिसांची सुरक्षा यंत्रणा प्रत्यक्षातही बरीच महागडी असल्याचे सिद्ध झाले आहे.
मडगाव - एफसी गोवा फॅन क्लबचा सदस्य लेस्टर फर्नाडिस याला मारहाण केल्यामुळे एफसी गोवा क्लबसाठी काही प्रमाणात महागडी ठरलेली गोवा पोलिसांची सुरक्षा यंत्रणा प्रत्यक्षातही बरीच महागडी असल्याचे सिद्ध झाले आहे. एका सामन्यासाठी एफसी गोवा या पोलीस यंत्रणोसाठी तब्बल 31 लाख रुपये खर्च करत असून एवढी महागडी सुरक्षा यंत्रणा आम्हाला परवडत नाही असा दावा या फ्रेन्चाईजी क्लबने केला आहे.
आतापर्यंत मागच्या चार मौसमात एफसी गोवा संघाच्या मालकाला सुरक्षा यंत्रणोपोटी गोवा पोलिसांकडून 9.70 कोटींचे बिल आले असून, त्यापैकी 7.30 कोटी रुपयांचा भरणा क्लबने केला आहे. मात्र हे पैसे फेडताना क्लबने आपला निषेधही नोंदविला आहे. पुणे-मुंबईच्या तुलनेतही गोव्यातील पोलिसांची सुरक्षा यंत्रणा बरीच महाग असल्याचे या क्लबने मुख्यमंत्री कार्यालयाला लिहिलेल्या पत्रत म्हटले आहे.
गुवाहाटीत अशी सुरक्षा देण्यासाठी नॉर्थ इस्ट युनायटेड एफसी क्लबला तसेच जमशेदपूरमध्ये यजमान जमशेदपूर एफसी क्लबला सामन्यादरम्यान पोलीस यंत्रणेला एकही पैसा द्यावा लागत नाही. पुणे, मुंबई व बंगळुरू येथेही पोलीस सुरक्षेची दर सामन्यामागची फी दोन लाखाच्या आसपास असते. मात्र गोव्यातच केवळ पोलीस बंदोबस्तासाठी एफसी गोवा क्लबला 24 लाख द्यावे लागतात. तर वाहतुक यंत्रणा सांभाळण्यासाठी वाहतूक पोलिसांना तसेच बॉम्ब डिस्पोजल पथकाच्या पोलिसांची फी पकडल्यास दर सामन्यामागे या यंत्रणोसाठी 31 लाख द्यावे लागतात.
सध्या एफसी गोवा क्लब कॅसिनोमालक जयदेव मोदी हे चालवित आहेत. मात्र त्यांना या क्लबचे जुने मालक दत्तराज साळगावकर व श्रीनिवास धेंपे यांनी सुरक्षे यंत्रणोपोटी थकवून ठेवलेली बाकीही भरावी लागली आहे. 2014 साली सुरक्षा यंत्रणोपोटी 1.50 कोटींचे बील आले होते. 2016 साली हा आकडा 3.20 कोटींवर पोहोचला. 2016 साली 1.70 कोटी तर 2017 मध्ये 3.30 कोटी रुपयांचे बील सुरक्षेपोटी या क्लबला भरावे लागले आहेत.
दर सामन्यामागे फातोर्डा स्टेडियमवर बंदोबस्तासाठी 600 पोलीस तैनात केले जातात. त्यासाठी दोन पाळ्यात यजमान क्लबला शुल्क भरावे लागते. देशातील इतर भागात जसे शुल्क आकारले जाते त्याप्रमाणो गोव्यातही आकारले जावे अशी मागणी क्लबकडून करण्यात आली आहे. या मागणीवर विचार करण्यासाठी गोवा सरकारने क्रीडा खात्याचे सचिव जे. अशोककुमार यांच्यासह वित्त खात्याचे अतिरिक्त सचिव आणि पोलीस मुख्यालय अधीक्षक अशी तीन सदस्यांची समिती नेमली आहे. या बाबतीत सध्या 600 ऐवजी 550 पोलीस सामन्याच्यावेळी तैनात करावे आणि दोन पाळ्याऐवजी दीड पाळीचे भाडे आकारावे असा तात्पुरता तोडगा पुढे आला आहे.