म्हापसा शहराच्या नुतनीकरणावर ३५ कोटींचा खर्च अपेक्षित- मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 03:35 PM2017-10-03T15:35:18+5:302017-10-03T15:35:44+5:30
गोव्यातील शहरे साधन सुविधा युक्त करण्याच्या दृष्टीने सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमाचा भाग म्हणून म्हापसा शहराचा विकास आराखडा तसेच शहराचे नुतनीकरण गतिमान करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.
म्हापसा - गोव्यातील शहरे साधन सुविधा युक्त करण्याच्या दृष्टीने सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमाचा भाग म्हणून म्हापसा शहराचा विकास आराखडा तसेच शहराचे नुतनीकरण गतिमान करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. या कामावार अंदाजीत ३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी म्हापसाला भेट देऊन विविध अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा सुरु केली. या शहरातील बाजारपेठ शुक्रवारच्या बाजारासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेली बाजारपेठ आहे.
पणजी शहर स्मार्ट शहर करण्याच्या दृष्टीने पावले उचवण्यात आल्यानंतर सरकार आता म्हापसा बरोबर राज्यातील इतर शहरे म्हापसा, मडगाव, वास्को ही शहरे विकसित करणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. यावेळी नगराध्यक्ष रोहन कवळेकर तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. मागील अनेक वर्षांपासून सुरु असलेले जायका हा मलनिसारण प्रकल्प डिसेंबर महिन्यात कार्यान्वीत करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
शहराच्या नुतनीकरणासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आल्याची माहिती पर्रीकर यांनी दिली. या दलाचे अध्यक्षपद नगराध्यक्ष रोहन कवळेकर यांच्याकडे सोपवण्यात आले असून त्यावर जायका, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते व पाणी विभागाचे अधिकारी तसेच सुडाचे प्रतिनिधी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
जायकाच्या प्रकल्पामुळे खराब झालेले रस्ते व इतर समस्यांवर तोडगा काढण्यासाठीची प्रक्रिया पुढील दोन महिन्याच्या आत सुरु होणार असल्याची माहिती दिली. त्यासाठी जायकाला आराखडा तयार करण्यास सांगण्यात आलेला आहे. या संबंधीची पुढील बैठक १७ आॅक्टोबर रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. शहरातील पाण्याच्या पाईपलाईन्स सुद्धा बदलण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
काल शहरात दाखल झाल्यानंतर पर्रीकर यांनी सकाळी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाला भेट देऊन तेथील अधिकाऱ्यां समवेत चर्चा केली. त्यानंतर सब रजिस्ट्रारच्या कार्यालयाला व जुन्या आझिलो हॉस्पिटलाच्या परिसराला भेट दिली. उपजिल्हाधिकाºयाचे कार्यालय जुन्या आझिलो हॉस्पिटल परिसरात स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी सदर ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच कर विभाग कार्यालय सुद्धा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दिली. सब रजीस्ट्रारच्या कार्यालयाला नवी लिफ्ट बसवण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
म्हापसा मार्केटच्या नुतनीकरणाचे कामही हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थ संकल्पात २० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आलेली. या कामासाठी अंदाजीत ३५.२६ कोटी रुपये खर्च अपेक्षीत असून पहिल्या टप्प्यात त्यावर २० कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. नगराध्यक्ष रोहन कवळेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटी संबंधी बोलताना पालिकेच्यावतिने त्यांना शहराच्या आराखड्या संबंधी सादरीकरण करण्यात आल्याची माहिती पत्रकारांना दिली. तसेच पालिकेला असलेल्या समस्या व विविध योजना त्यांच्या समोर मांडण्यात आल्याची माहिती दिली. मार्केट प्रकल्पाच्या आराखड्याला सरकारकडून तत्त्वत: मान्यता मिळाली असल्याचे कवळेकर यांनी सांगितले.