बाजारात नैसर्गिक रंग ३५० प्रती किलाे; मागणी नसल्याने रासायनिक रंग ८० रुपये किलोवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 04:37 PM2024-03-21T16:37:23+5:302024-03-21T16:37:45+5:30
रासायनिक रंग अंगाला चिकटून राहतो पाण्याने साफ करुनही तो सहज जात नाही तसेच डाेळ्यात गेल्यावर डोळ्याला इजा होण्याची शक्यता आहे. तसेच ताेंडात गेल्यावर त्याचे परिणामही जाणवतात. त्यामुळे याला पर्याय म्हणून आता नैसर्गिक रंग वापरला जात आहे.
नारायण गावस -
पणजी: शिमगोत्सवात रंगाला मोठी मागणी असल्याने बाजारात माेठ्या प्रमाणात रंग विक्रीस आले आहे. पण वाढत्या आराेग्याच्या काळजीमुळे आता लोक रासायनिक रंगापेक्षा हर्बल म्हणजे नैसर्गिक रंगाचा वापर जास्त करत आहेत. याचा परिणाम म्हणून रासायनिक रंगाचा दर खाली आला असून नैसर्गिक रंगाच्या किमती वाढल्या आहे. बाजारात नैसर्गिक रंग ३५० रुपये किलाेने विकला जात आहे. तर रसायनिक रंग ८० ते १०० रुपये प्रती किलाेने विकला जात आहे.
रासायनिक रंग अंगाला चिकटून राहतो पाण्याने साफ करुनही तो सहज जात नाही तसेच डाेळ्यात गेल्यावर डोळ्याला इजा होण्याची शक्यता आहे. तसेच ताेंडात गेल्यावर त्याचे परिणामही जाणवतात. त्यामुळे याला पर्याय म्हणून आता नैसर्गिक रंग वापरला जात आहे. फळांपासून, फुलांपासून तसेच बियांपासून व झाडांच्या खोडापासून हा रंग तयार केला जाताे. हा रंग अंगावर चिकटून राहत नाही तसेच डोळ्यात ताेंडात गेल्यावर त्याचा परिणाम जाणवत नाही. म्हणून आता अनेक कंपन्यांनी नैसर्गिक रंगाची निर्मिती केली आहे. अनेक कंपन्यांनी आपला हर्बल रंग मार्केटमध्ये आणला आहे. त्यामुळे या रासायनिक रंगाची मागणी घटली आहे. म्हणून दरही खाली आले आहेत.
राज्यातील जैवविविध मंडळातर्फे हा नैसर्गिक रंग तयार केला जातो. तसेच विविध महिला मंडळांना रंग तयार करण्याचे प्रशिक्षण जैवविविधता मंडळाने दिले आहे. पुढील काही वर्षापासून पूर्णपणे हा नैसर्गिक रंगाचा वापर केला जाणार आहे त्यामुळे आता या रासायनिक रंगाची मागणी खूपच कमी होणार आहे.
बाजारात रंगाप्रमाणे शिमगाेत्सवाला लागणारे मुखवटे तसेच पिचकारी खरेदीसाठी उपलब्ध आहेत. विविध मुखवटे ५० ते १०० अशा विविध दरात विकली जात आहेत. तसेच पिचकारीही ४० ते २०० रुपये पासून विकली जात आहेत. शिमगोत्सवाने बाजारपेठ्या फुलल्या असून लाेक माेठ्याप्रमाणात खरेदी करत आहे.