रुबी रेसिडन्सी दुर्घटना, दहा जणांची निर्दोष मुक्तता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 03:54 PM2017-11-20T15:54:24+5:302017-11-20T15:55:49+5:30
काणकोण येथील रुबी रेसिडन्सी दुर्घटना प्रकरणात आठ सरकारी अधिका-यांसह एकूण दहा जणांना मडगावच्या सत्र न्यायालयाने आरोप निश्चितीपूर्वीच निर्दोष मुक्त केले.
मडगाव - गोवा मुक्तीनंतरची सर्वात मोठी दुर्घटना असे वर्णन केलेल्या काणकोण येथील रुबी रेसिडन्सी दुर्घटना प्रकरणात आठ सरकारी अधिका-यांसह एकूण दहा जणांना मडगावच्या सत्र न्यायालयाने आरोप निश्चितीपूर्वीच निर्दोष मुक्त केले. तर या इमारतीचा कंत्रटदार विश्वास देसाई याच्या विरोधात भादंसंच्या 304 (अ) (हलगर्जीपणामुळे मृत्यू) या कलमाखाली आरोप निश्र्चित करत पुढील सुनावणीसाठी हे प्रकरण काणकोण न्यायालयात वर्ग केले.
पणजीपासून 70 कि.मी. अंतरावर असलेल्या काणकोण तालुक्यातील चावडी-काणकोण येथे 4 जानेवारी 2014 रोजी ही दुर्घटना घडली होती. इमारतीचे बांधकाम चालू असताना पाच मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली होती. त्यात 31 कामगारांना मृत्यू आला होता. या प्रकरणात काणकोण पोलिसांनी इमारत कंत्रटदार विश्र्वास देसाई याच्यासह बिल्डर परदीप सिंग बिरिंग व जुगदीपकुमार सेहगल याच्यासह अतिरिक्त जिल्हाधिकारी दीपक देसाई, उपजिल्हाधिकारी प्रशांत शिरोडकर, प्रदीप नाईक तसेच अन्य पालिका अभियंत्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली आरोपपत्र दाखल केले होते.
या इमारतीची आवश्यक ती तपासणी न करता लाच घेऊन या इमारतीला परवाना दिला. त्यामुळेच ती कोसळली असा दावा करुन सर्व संशयितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही नोंद केला होता.सोमवारी मडगावचे प्रधान सत्र न्यायाधीश बी.पी. देशपांडे यांनी या प्रकरणात पैशांची देवाण-घेवाण झाल्याचा एकही प्रथमदर्शनी पुरावा पुढे आलेला नाही असे नमूद करुन दहा संशयितांना आरोप निश्चितीपूर्वीच निर्दोष मुक्त केले.
बिल्डींग कंत्रटदार याच्यावरील सदोष मनुष्यवधाचा आरोप रद्द करताना केवळ हलगर्जीपणामुळे मृत्यू या गुन्हयाखाली आरोप निश्चित केला. सदर गुन्हयासाठी तीन वर्षापेक्षा कमी शिक्षेची तरतूद असल्यामुळे हा खटला पुढील सुनावणीसाठी काणकोणच्या प्रथम वर्ग न्यायालयात पाठविण्यात आला.