महिलेशी असभ्य वर्तन!
By admin | Published: July 27, 2016 02:03 AM2016-07-27T02:03:39+5:302016-07-27T02:04:07+5:30
कल्पेश काटकर ल्ल पणजी आपल्या कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तनप्रकरणी वन खात्याच्या एका उपवनपालाला दीर्घ रजेवर पाठविण्यात आले आहे.
कल्पेश काटकर ल्ल पणजी
आपल्या कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तनप्रकरणी वन खात्याच्या एका उपवनपालाला दीर्घ रजेवर पाठविण्यात आले आहे. वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ही कारवाई केल्याचे वृत्त आहे.
हा अधिकारी दक्षिण गोव्यातील एका विभागीय क्षेत्रीय कार्यालयाचा प्रमुख असून त्याचे वागणे हे सभ्यतेला धरून नसल्याच्या तक्रारी होत्या. वरिष्ट वनाधिकाऱ्यांकडे तक्रारी देऊनही दखल घेतली जात नसल्याचे दिसून आल्यावर काहींनी थेट वनमंत्र्यांच्या कानावर या गोष्टी घातली. एका महिला कर्मचाऱ्याला त्याने खूपच सतावल्याची तक्रार होती. हा अधिकारी आपल्याकडे अत्यंत असभ्य वागत असल्यामुळे कार्यालयात काम करणे मुश्कील झाल्याचे त्या महिला कर्मचाऱ्याने मंत्र्यांना सांगितल्यावर तडकाफडकी त्या अधिकाऱ्याला सक्तीच्या दीर्घ रजेवर पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिलेकडून तक्रार गेल्यानंतर कार्यालयातील इतर काही कर्मचाऱ्यांंकडून त्याची खातरजमा करून घेतल्यानंतरच ही कारवाई करण्यात आली.
याविषयी प्रधान मुख्य वनपाल अजय सक्सेना यांना विचारले असता त्यांनी त्या विषयावर आपण काहीच बोलणार नाही, असे सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अधिकाऱ्याला जोपर्यंत त्याची बदली इतरत्र होत नाही, तोपर्यंत कामावर रुजू होण्यास मनाई करण्यात आली आहे.
थेट मंत्र्यांच्या कार्यालयातून हस्तक्षेप करून कारवाई करण्याची अलीकडील ही पहिलीच घटना आहे. अधिकाऱ्यांच्या असभ्य वागण्यामुळे कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांना असुरक्षिततेचे वातावरण बनू लागल्यामुळे ही चिंतेची बाब बनली आहे. यापूर्वीही सरकारी कार्यालयांत अशा गोष्टी घडलेल्या आहेत. या प्रकारांना वचक बसावा यासाठी प्रत्येक सरकारी कार्यालयात आणि मुख्य अधिकाऱ्याच्या केबिनसह सर्व ठिकाणी सीसी टीव्ही कॅमरे लावण्याच्या सूचनाही करण्यात आल्या होत्या.