राजीनाम्याची अफवा, कार्यकाळ पूर्ण करेन; रवी नाईक यांची स्पष्टोक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2024 09:06 AM2024-01-25T09:06:52+5:302024-01-25T09:07:02+5:30
काहीजणांना स्वप्ने पडत असल्याचा टोला
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : रवी नाईक मंत्रीपदाचा आणि फोंड्याच्या आमदारकीचा राजीनामा देतील, अशी अफवा काहीजणांनी पिकवली होती. मात्र स्वतः रवी यांनी काल एका वृत्त वाहिनीशी बोलताना ही निव्वळ अफवा असल्याचे सांगत आपण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करीन, असा विश्वास व्यक्त केला.
रवी नाईक हे कृषी मंत्री आहेत. ते फोंडा मतदारसंघातून सातत्याने निवडून आले आहेत. ते आमदारकीचा राजीनामा देतील व आपला मुलगा रितेश नाईक यांना ते विधानसभेच्या फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उभे करतील, अशी चर्चा पसरली होती. काहीजण मुद्दाम अफवा पिकवत होते.
मात्र नाईक यांनी सांगितले की, मला लोकांनी पाच वर्षांसाठी निवडून दिले आहे. मी पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करीन व मग मी पुढचा विचार काय तो करीन. मात्र सध्या आपला कोणताच वेगळा विचार नाही. मी राजीनामा देईन, अशी चर्चा देखील मी ऐकलेली नाही. कदाचित काहीजणांना कसली तरी स्वप्ने पडत असावीत. सध्या तसे काहीच नाही.