ग्रामस्थ तुरुंगात; सोनशीत शुकशुकाट
By admin | Published: April 15, 2017 02:05 AM2017-04-15T02:05:36+5:302017-04-15T02:07:09+5:30
दशरथ मांद्रेकर ल्ल वाळपई३० कुटुंबांचा छोटासा सोनशी गाव सध्या ओस पडला आहे. मंगळवारपासून गावात शब्दश: स्मशानशांतता पसरली आहे. खनिज वाहतूक
दशरथ मांद्रेकर ल्ल वाळपई
३० कुटुंबांचा छोटासा सोनशी गाव सध्या ओस पडला आहे. मंगळवारपासून गावात शब्दश: स्मशानशांतता पसरली आहे. खनिज वाहतूक रोखल्यामुळे गावातील ४५ जणांना कोलवाळ तुरुंगात डांबल्यामुळे गावातील सर्वच घरांना कुलपे लावलेली दिसून येतात. पालक तुरुंगात अडकल्याने मुलांचे हाल होत आहेत.
लोकशाही व्यवस्था किती महागात पडते, याचे उदाहरण सोनशी गावात पाहावयास मिळते. सध्या गावात शांतता, तर रस्त्यावरून खनिज ट्रकांची उन्मत्त वर्दळ, अशी विरोधाभासाची स्थिती दिसते. गावातून सेसा गोवा, केणी, डीएमसी, फोमेन्तो, आयएलपीएलसारख्या बड्या खाण कंपन्यांची वाहतूक सुरू आहे. खाण कंपन्या सुरू झाल्यापासून गावाला समस्या पोखरू लागल्या. धूळ प्रदूषण, पाणीटंचाईने डोके वर काढले. नागरिकांनी सरकार दरबारी तसेच खाण कंपन्यांकडे गाऱ्हाणी मांडली; पण न्याय मिळाला नाही. कंटाळलेल्या नागरिकांनी लोकशाही पद्धतीनेच रास्ता रोको केला. प्रथम प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देऊन आंदोलन बंद करण्यास सांगण्यात आले; पण बैठकीत तोडगा न निघाल्याने नागरिकांनी परत रस्ता रोको केला. त्या वेळी त्यांना अटक करून सोडून देण्यात आले; पण तोडगा काढण्यात आला नाही. उलट कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात खनिज वाहतूक सुरू केली. त्या विरोधात नागरिकांनी पुन्हा रस्ता रोको केला आणि पोलिसांनी ४५ जणांना अटक करून न्यायालयीन कोठडी दिली. या आंदोलकांची मुले सध्या हलाखीत जगत आहेत. सर्वच घरे बंद असून मुले आई-वडिलांच्या वाटेवर डोळे लावून आहेत.
धुळीने माखला गाव
सोनशी गावाजवळून जाणाऱ्या रस्त्यावर ११८४ ट्रक सुरू आहेत. त्यामुळे दर पाच सेकंदाला ट्रक येत असून पाच मिनिटांनी ट्रक सोडण्याचे खाण कंपन्यांनी दिलेले आश्वासन धाब्यावर बसविल्याचे दिसते. गावात धूळ प्रदूषण झाले आहे.
पावसाळ्यात माती
वाहून येण्याची शक्यता
खाण कंपनीने साठविलेली माती पावसाळ्यात गावात वाहून येण्याची शक्यता आहे. गावाजवळच मातीचे मोठमोठे ढिगारे असून पावसाळ्यात त्या ढिगाऱ्यांची माती गावात आल्यास गाव मातीखाली
जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. शाळेलाही धोका आहे.
सरकारची खाण कंपन्यांना साथ
सरकारने प्रथमपासून खाण कंपन्यांची साथ दिली आहे. ग्रामस्थांनी आंदोेलन सुरू केल्यापासून नागरिकांचे कोणतेही प्रश्न सोडविले नसून पोलिसांनीसुद्धा खाण कंपन्यांचे समर्थन करताना नागरिकांना तुरुंगात डांबले आहे, असा आरोप नागरिक करत आहेत. सध्याची स्थिती सोडविण्यासाठी सरकारने नागरिकांना साथ देण्याची गरज होती; पण स्थिती विपरित आहे.
अतिरिक्त वाहतूक बंदचा आदेश
डिचोली उपजिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन शनिवारपासून अतिरिक्त खनिज वाहतूक बंद करण्याचा आदेश दिला. ११८४ ट्रकव्यतिरिक्त आणखी ट्रक वाहतुकीला न घेण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार उपजिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला. खाण कंपन्या आणखी ४00 अतिरिक्त ट्रक घेणार होत्या.
(प्रतिनिधी)