नरकासूर प्रतिमा बनविण्यासाठी युवकांची लगबग; पणजीसह राज्यभरात प्रतिमा उभारण्याची तयारी सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 11:34 AM2023-10-28T11:34:56+5:302023-10-28T11:35:37+5:30
नरकासुराच्या आक्राळ विक्राळ प्रतिमा उभारण्यासाठी तरुण वर्ग रात्र जागून काढत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दिवाळीला अवघे १५ दिवस शिल्लक असल्याने राज्यभरातील युवक आता नरकासूर प्रतिमा तयार करण्याच्या कामात व्यस्त झाले आहेत. नरकासुराच्या आक्राळ विक्राळ प्रतिमा उभारण्यासाठी तरुण वर्ग रात्र जागून काढत आहेत.
राज्यात मागील काही वर्षांपासून नरकासुराच्या मोठ्या प्रतिमा तयार करून मिरवणूक काढण्याचे प्रकार वाढले आहेत. पूर्वी फक्त गावागावात नरकारसूर उभारले जायचे. आता शहरी भागातही नरकासुराच्या भल्या मोठ्या प्रतिमा उभारल्या जात आहेत.पणजी शहरात तसेच आजूबाजूच्या भागातील नरकासूर पाहण्यासाठी लोकांच्या रांगा लागतात. यासाठी हे युवक स्वत: पैसे काढतात. तसेच राजकारणी, उद्योगपती व आपापल्या भागातील लोकांकडून पैसे जमवून नरकासूर प्रतिमा तयार केल्या जातात.
राज्यात मोठ-मोठ्या नरकासूर प्रतिमा तयार करून त्यांची मिरवणूक काढण्यात येते. पणजीसह मडगाव, म्हापसा, फोंडा अशा मोठ्या शहरात नरकासूर स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. मोठे नरकासूर तसेच आकर्षक देखाव्यासाठी बक्षिसेही दिली जातात. त्यामुळे लोकांचे मनोरंजन होत असते.
देणग्या देणे बंद केलेय
दिवाळी जवळ आली की लोक नरकासुरसाठी सरपंच, पंचायत सदस्य, आमदार, मंत्री यांच्याकडे देणग्या मागतात. काहीजण देणग्या देतातही. मात्र ते चुकीचे आहे. नरकासूर ही चुकीची प्रथा आहे. नरकासूर ऐवजी पारंपरिक सण जसे धेंडलो, पाडवा, तुळशी विवाह हे मोठ्या प्रमाणात साजरे केले जावे, असे आवाहन मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.