ऐतिहासिक चित्रपट करताना इतिहासाशी प्रतारणा चालत नाही! अभिनेते सचिन खेडेकर यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2017 10:32 PM2017-11-25T22:32:43+5:302017-11-25T22:36:37+5:30
ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करताना इतिहासाशी प्रतारणा करून चालत नाही. असे ऐतिहासिक चित्रपट करताना सत्यता आणि जबाबदारपणा सांभाळला पाहिजे.
- विलास ओहाळ
पणजी- ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करताना इतिहासाशी प्रतारणा करून चालत नाही. असे ऐतिहासिक चित्रपट करताना सत्यता आणि जबाबदारपणा सांभाळला पाहिजे. ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ हा चित्रपट करताना श्याम बेनेगल यांनी तो जबाबदारपणा पाळल्याचे आपणास दिसते, असे सांगत अभिनेते सचिन खेडेकर यांनी ऐतिहासिक चित्रपट करणाऱ्या दिग्दर्शकांना कानपिचक्या दिल्या.
बायोस्कोप व्हिलेजच्या कट्ट्यावर शनिवारी रात्री मीना कर्णिक यांनी अभिनेते सचिन खेडेकर यांची मुलाखत घेतली. कच्चा लिंबू आणि मुरांबा हे चित्रपट इफ्फीत असून, त्यातील दोन्ही चित्रपट इफ्फीत स्पर्धेत आहेत. त्याविषयी खेडेकर म्हणाले की, प्रसाद ओक आणि वरूण नार्वेकर हे दोन्हीही तरुण आणि पहिलाच सिनेमा दिग्दर्शित करीत असल्याने त्यांच्याकडून मला बऱ्याच अपेक्षा होत्या. कारण तरुण पिढीकडे बरेच विषय मांडण्यासारखे आहेत. नामवंत दिग्दर्शकांना त्याच-त्याच पठडीतील चित्रपट बनविण्याशिवाय पर्याय नसतो, असे सांगत त्यांनी सोशल मीडियावरून आता चित्रपट पाहण्याची मोठी सोय झाल्याचेही त्यांनी कौतुक केले.
दाक्षिणात्य चित्रपटाचे आव्हान!
खेडेकर एका प्रश्नाला उत्तर देताना पुढे म्हणाले की, मराठी, हिंदी चित्रपट करण्यापेक्षा दाक्षिणात्य चित्रपट करण्याचे फार मोठे आव्हान असते. येथे बाहेरील कलाकारांना फार सन्मान दिला जातो. तेलगु भाषेमध्ये एका शब्दात अनेक अर्थ दडलेले असल्याने त्यात राग, लोभ, प्रेम असे सर्व प्रकार एकाचवेळी दर्शविण्यासाठी शब्द उच्चरावे लागतात. येथील सिनेसृष्टीतील लोक फार मेहनती आहेत. शिवाय या भाषेतील चित्रपट पाहणारे रसिकही फार चित्रपटवेढे आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे चित्रपटांना गर्दी दिसून येते.
शॉ..काय नाटक!
गोव्याविषयी बोलताना खेडेकर म्हणाले, चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी आपण जेव्हा रंगभूमी करत होतो, तेव्हा गोवा दौरा व्हायचा. या राज्यातील महत्त्वाच्या शहरात नाटके केले जायची. जेव्हा नाटक पाहून लोक बाहेर यायचे तेव्हा लोक ‘शॉ..काय नाटक आहे!’ असे म्हणायचे. त्यामुळे हे लोक नक्की नाटकाचे कौतुक करतात की नापसंती दर्शवितात, हे कळत नव्हते. पण नंतर कळाले की, ती नाटकाचे केले जाणारे कौतुक आहे, तेव्हा रसिकांमध्ये हशा पिकला.
गोवेकरांनी संस्कृती टिकवली!
गोव्यात नाटक, सिनेमा पाहणारी रसिक मंडळी आहे. शिवाय त्यातील कलाकारही आहेत. येथे थिएटरला लागणारे मराठी चित्रपट आणि मराठी नाटकांना येणारे रसिक पाहिल्यानंतर ख:या अर्थाने गोव्यातील जनतेने संस्कृती टिकवून ठेवली आहे, हे दिसते, असेही खेडेकर म्हणाले.
रिअॅलिटी म्हणजे उसनी नक्कल!
दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रमाविषयी बोलताना खेडेकर म्हणाले की, विजय तेंडुलकर नेहमी ‘रिअॅलिटी शो’ विषयी सांगत. यातील गाण्यांच्या कार्यक्रमात जी मुले जुनी गाणी गातात, त्यांना परीक्षक गुण देतात. पण या मुलांना काय माहीतच नसते की उसनवारी आणि नक्कल आहे म्हणून. त्यामुळे रिअॅलिटी शोची कल्पनाच मुळीची चुकीचे वाटते. त्याचबरोबर आपण मराठीतील ‘कोण बनेल करोडपती’ या मालिकेने पुन्हा सामान्य माणसांर्पयत पोहोचण्याची संधी दिल्याची आठवण करून दिली.