दोन जागा हरल्याविषयी दु:ख, मात्र पुन्हा जिंकू : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 06:34 PM2019-05-24T18:34:54+5:302019-05-24T18:35:49+5:30
आपण निवडणूक निकालांचे पूर्ण विश्लेषण केले. त्यावर विचार केला. आमचे पणजीत काय चुकले ते आम्हाला पहावे लागेल. थोडी पाऊले उचलावी लागतील.
पणजी : पंचवीस वर्षे पणजी विधानसभा मतदारसंघात भाजप कधीच हरला नव्हता. यावेळी पणजीत पराभव झाल्याविषयी दु:ख आणि खेद वाटतो. तसेच दक्षिण गोव्यात नरेंद्र सावईकर यांचा पराभव झाल्यानेही वाईट वाटते, दु:ख होते अशा शब्दांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच पणजी विधानसभा मतदारसंघ आणि दक्षिण गोवा ह्या दोन्ही जागा भाजपला पुन्हा जिंकायच्या आहेत व त्यासाठी संघटनात्मक काम तिथे वाढविले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की आपण निवडणूक निकालांचे पूर्ण विश्लेषण केले. त्यावर विचार केला. आमचे पणजीत काय चुकले ते आम्हाला पहावे लागेल. थोडी पाऊले उचलावी लागतील. पणजीत लोकसभा निवडणुकीवेळी भाजपला आघाडी प्राप्त झाली पण विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मते कमी पडली. श्रीपाद नाईक यांनी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात पाचव्यांदा जिंकण्याचा विक्रम केला. त्याविषयी आम्हाला खूप आनंद वाटतो. उत्तरेत भाजपला 57 टक्के मते मिळाली व काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांना 38 टक्के मते प्राप्त झाली.
मुख्यमंत्री म्हणाले, की दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात नरेंद्र सावईकर या सक्रिय खासदाराचा का पराभव झाला यावरही आम्ही विचार करत आहोत. सावईकर हे कायम लोकसभा मतदारसंघात फिरायचे. कायम लोकांसोबत रहायचे. त्यांच्या पराभवाविषयी खेद वाटतो. केवळ मडकई मतदारसंघातच आमची आघाडी कमी झाली म्हणून पराभव झाला असे म्हणता येत नाही. कारण अन्य काही मतदारसंघांमध्येही आम्हाला अपेक्षेपेक्षा थोडी कमी मते मिळाली. त्यात वास्को, मडगाव, सावर्डे आदी मतदारसंघांचा समावेश होतो. केवळ एकाच कारणामुळे पराभव झाला असे मुळीच नाही. विविध कारणो असतील. खनिज खाण बंदीचा परिणाम उत्तर गोव्यात काहीच जाणवला नाही. दक्षिणोत थोडा संमिश्र परिणाम दिसला.
मुख्यमंत्री म्हणाले, की मांद्रे मतदारसंघ पुन्हा भाजपने जिंकला. म्हापशातही आम्ही जिंकलो आणि शिरोडय़ातही विजय मिळवला. शिरोडय़ात काहीजणांनी मतदारांना आमिषे दाखविण्याचा प्रयत्न केला पण लोकांनी भाजपला कौल दिला. मतदार व कार्यकत्र्याचे आम्ही आभार मानतो.