आमदार फुटून आले, परंतु त्यांचे मतदार आले नाही; सदानंद तानावडे यांची 'लोकमत' वार्तालापात कबुली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2024 10:58 AM2024-07-09T10:58:56+5:302024-07-09T11:00:49+5:30

पराभवाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी

sadanand shet tanavade exclusive interview to lokmat goa | आमदार फुटून आले, परंतु त्यांचे मतदार आले नाही; सदानंद तानावडे यांची 'लोकमत' वार्तालापात कबुली 

आमदार फुटून आले, परंतु त्यांचे मतदार आले नाही; सदानंद तानावडे यांची 'लोकमत' वार्तालापात कबुली 

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: आमदार फुटून भाजपमध्ये आले; परंतु त्यांच्यासोबत त्यांचे मतदार मात्र आले नाहीत, अशी कबुली भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी दिली. 'लोकमत' कार्यालयास दिलेल्या सदिच्छा भेटीनंतर वार्तालापात ते बोलत होते.

यावेळी तानावडे म्हणाले की, आमदार आले म्हणून त्यांच्यासोबत कार्यकर्ते किंवा त्यांचे मतदार येतात असे नव्हे. दक्षिण गोव्यात जिंकलो नाही, याचा दोष मी कोणाला देणार नाही. या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यातील काही विधानसभा मतदारसंघांमध्ये आम्हाला अपेक्षित मते मिळाली नाहीत. संघटनात्मकदृष्ट्या आम्ही कमी पडलो, प्रदेशाध्यक्ष म्हणून ती माझी जबाबदारी आहे, असे मी मानतो.

लोकसभेसाठी दक्षिण गोव्यात पल्लवी धेपे यांना तिकीट देण्याचा निर्णय मुलीच चुकीचा नव्हता. या मतदारसंघात उलट प्रथमच आम्हाला दोन लाखांपेक्षा अधिक मते मिळाली ही देखील मोठी उपलब्धीच आहे. संघटनात्मकदृष्ट्वाच आम्ही कमी पडलो. ज्या काही त्रुटी आहेत त्या आगामी काळात सुधारल्या जातील, असेही तानावडे एका प्रश्नावर म्हणाले. केंद्र सरकारने महिलांसाठी ३३ टक्के राजकीय आरक्षण संमत केलेले आहे त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची अधिकाधिक महिला नेत्या तयार व्हाव्यात, यासाठी प्रयत्न आहेत. गोव्यातील दोनपैकी एक जागेवर महिला उमेदवार द्या, असा आदेश खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. त्यानंतरच पल्लवी यांचे नाव पुढे आले, असे त्यांनी सांगितले.

तानावडे यांची १८ जुलै २०२३ रोजी राज्यसभा खासदार म्हणून निवड झाली होती. या गोष्टीला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. या अनुषंगाने त्यांना राज्यसभेतील त्यांच्या कामगिरीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, पोर्तुगीज पासपोर्ट तसेच ओसीआय कार्डचा विषय मी राज्यसभेत मांडला. या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला आणि हा प्रश्न सोडवूनही घेतला आहे.

प्रवाह प्राधिकरण पक्षपात करू शकत नाही

राज्यात २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी एसटी आरक्षणाची मागणी पूर्ण करून घेण्यासाठी सरकारचा तसेच पक्ष म्हणून आमचाही प्रयल चालू आहे. म्हादईचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. विरोधक म्हादई प्रश्न राजकारण करीत असल्याचे तानावडे म्हणाले. या प्रकरणात प्रवाह प्राधिकरण पक्षपात करू शकत नाही. गोव्याला न्याय मिळणार, असे ते म्हणाले.

राज्यसभेत दर २ तासांनी घेतली जाते हजेरी

तानावडे म्हणाले की, राज्यसभेत सत्ताधारी भाजप खासदारांना शिस्तीने वागावे लागते. दर दहा खासदारांमागे पक्षाचा एक व्हीप असतो. शिवाय प्रमुख व्हीपही आहे. खासदार सभागृहात उपस्थित आहे की नाही, याची नोंद दर दोन तासांनी घेतली जाते. उपस्थित नसल्यास दुसऱ्या दिवशी फोन येतो व संबंधित खासदाराला पक्षाच्या विधिमंडळ नेत्याकडे स्पष्टीकरण द्यावे लागते. असे तानावडेंनी सांगितले.

राज्यसभेत असते आश्वासन समिती

राज्यसभेत दिलेली सर्वच आश्वासने पूर्ण होतात काय? पूर्ण न झालेल्या आरवासनांचे काय, असा प्रश्न केला असता तानावडे म्हणाले की, आश्वासन समिती आहे. दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्यास विचारणा करता येते.

चार राज्यांमध्ये निवडणुका झाल्यानंतरच संघटनात्मक बदल

तानावडे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद व राज्यसभा खासदार अशी दोन्ही पदे आहेत. लवकर संघटनात्मक निवडणुका होणार आहेत का, असा प्रश्न केला असता ते म्हणाले, सर्व प्रदेशाध्यक्षांचा कार्यकाळ जानेवारी २०२४ मध्ये संपलेला आहे. आता चार राज्यांमध्ये निवडणुका झाल्यानंतरच संघटनात्मक निवडणुका होतील. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी दिं. ११ रोजी गोव्यात येणार असून, १२ रोजी भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होईल. यावेळी बैठक व्यापक स्वरुपाची असणार आहे. ६०० ते ७०० जणांच्या या बैठकीला मंडल अध्यक्ष व अन्य पदाधिकारी उपस्थित राहतील, अशी माहिती त्यांनी दिली.

खाणी सुरू होण्यासाठी आग्रही

लोकसभा निवडणुकीसाठी खाण भागात मोठ्या प्रमाणात मतदान झाले, त्याबाबत विचारले असता तानावडे म्हणाले की, खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. नये केंद्रीय खाणमंत्री जी. किशन रेट्टी यांची याच अनुषंगाने अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. खाणी सुरू व्हायला हव्यात. मंत्रिमंडळ फेररचनेवर तानावडे म्हणाले की, याबाबत कोणतीच बोलणी झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी आमदार, मंत्र्यांची घेतलेली बैठक येत्या विधानसभा अधिवेशनाच्या अनुषंगाने होती.

 

Web Title: sadanand shet tanavade exclusive interview to lokmat goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.