सदानंद तानावडे भेटले, परंतु पाठिंब्याबद्दल बोललेच नाहीत! लक्ष्मीकांत पार्सेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2024 02:04 PM2024-05-02T14:04:20+5:302024-05-02T14:05:01+5:30
श्रीपाद नाईक माझे मित्र, योग्य तेच करीन
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे मला घरी येऊन भेटले, परंतु श्रीपाद नाईक यांना पाठिंबा द्या वगैरे काहीच सांगितलेले नाही, असे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी 'लोकमत'ला सांगितले.
दुसरीकडे तानावडे यांचे असे म्हणणे आहे की, सोमवारी रात्री त्यांनी पार्सेकर यांची भेट घेतली व श्रीपाद यांच्यासाठी काम करण्याची विनंती त्यांना केलेली आहे. पाठिंब्यासाठी इतर नेत्यांना भेटतो, तसा मी माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनाही भेटलो. मी माझे कर्तव्य पार पाडले. आता काय तो निर्णय पार्सेकर यांनी घ्यायचा आहे. 'लोकमत' प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले की, तानावडे माझ्याकडे आले होते, परंतु त्यांनी दोन्ही जागा भाजप खात्रीपूर्वक कशा जिंकणार एवढेच मला सांगितले. श्रीपाद यांच्यासाठी मी मांद्रे मतदारसंघात किंवा संपूर्ण उत्तर गोव्यात काम करावे अथवा एखाद्या प्रचारसभेत सहभागी व्हावे, असे काहीच सांगितले नाही किंवा माझा पाठिंबाही मागितला नाही.
मी भाजप सोडल्यानंतर कुठल्याही पक्षात गेलो नाही, म्हणून मला तसेच, मांद्रेतील माझ्या मतदारांनाही गृहीत धरू नये. मी राजकारणात सक्रिय नाही, म्हणजे राजकारण सोडले असे नाही, असा इशारा पार्सेकर यांनी याआधीच दिलेला आहे. त्या अनुषंगाने ते कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मनात असते ते प्रत्यक्षात बोला...
श्रीपाद नाईक त्यांच्याविरोधात काम करण्याचा मी विचारही करू शकत नाही. अवघ्या काही जणांनी गोव्यात भाजप पक्ष उभा केला त्यात आम्ही दोघेही होतो. श्रीपाद यांच्यासाठी काम कर हे मला सांगण्याची गरज नाही. परंतु, काहीजण मनात काही गोष्टी घेऊन येतात पण प्रत्यक्षात त्या बोलत नाहीत.
खलपांचाही फोन...
पाठिंब्यासाठी मला खलपांनीही फोन केला होता. येत्या काही दिवसांत मी माझी स्पष्ट करणार आहे, असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. अजून पाच-सहा दिवसांचा अवकाश आहे. लवकरच योग्य तो निर्णय घेईन, असेही पार्सेकर म्हणाले.