सहकार भारतीची रविवार, सोमवारी राष्ट्रीय परिषद
By admin | Published: May 11, 2017 01:42 AM2017-05-11T01:42:35+5:302017-05-11T01:42:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कमडगाव: सहकारी पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या ‘सहकार भारती’ या संघटनेच्या गृहनिर्माण पतसंस्था विभागाच्या पदाधिकाऱ्यांची
लोकमत न्यूज नेटवर्क
मडगाव: सहकारी पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या ‘सहकार भारती’ या संघटनेच्या गृहनिर्माण पतसंस्था विभागाच्या पदाधिकाऱ्यांची राष्ट्रीय परिषद रविवार, दि. १४ रोजी, तर मच्छीमारी पतसंस्था विभागाच्या पदाधिकाऱ्यांची राष्ट्रीय परिषद सोमवार, दि. १५ रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती सहकार भारती गोवा विभागाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी दिली.
या दोन्ही परिषदा मोती डोंगर मडगाव येथील शासकीय विश्रामधामात होणार आहेत. यावेळी वीजमंत्री पांडुरंग मडकईकर, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई, मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष उल्हास अस्नोडकर आदी उद्घाटन सत्रासाठी उपस्थित राहाणार आहेत.
यात गृहनिर्माण तसेच मच्छीमारी क्षेत्रातील पतसंस्थांना गृहनिर्माण विभागाचे प्रमुख अॅड. जयंत कुलकर्णी, मच्छीमारी पतसंस्था विभागाचे प्रमुख पांडुरंग नाईक तसेच सहकार भारतीचे राष्ट्रीय सरचिटणीस विजय देवांगण हे मार्गदर्शन करणार आहेत.
सहकार क्षेत्रात नव्याने सहमत झालेल्या स्थावर मालमत्ता नियमन कायदा तसेच मत्स्य उत्पादनाच्या वाढीसाठी सुरू केलेल्या नील क्रांतीच्या योजनांसंदर्भात व इतर पतसंस्थांच्या समस्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. सहकार भारती ही २२ राज्यातील गृहनिर्माण, मच्छीमारी, ग्राहक संस्था, विविध कार्यकारी संस्था तसेच नागरी व ग्रामीण कर्ज पुरवठा करणाऱ्या पतसंस्थांची शिखर संस्था असून गोव्यात अशाप्रकारची ही परिषद पहिल्यांदाच आयोजित केली जात असल्याची माहिती वेळीप यांनी दिली. या वेळी या संघटनेच्या गोवा विभागाचे सरचिटणीस सतीश भट तसेच राष्ट्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य सतीश वेळीप उपस्थित होते.