गोव्यातील साईभक्त पदयात्रेतून शिर्डीकडे रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 02:02 PM2019-02-06T14:02:54+5:302019-02-06T14:03:57+5:30
वयाची 75 वर्षे गाठलेल्या जेष्ठ नागरिकांपासून ते 20 वर्षीय युवकापर्यंतचे 70 साईभक्त बुधवारी (6 फेब्रुवारी) शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी गोव्यातून पदयात्रेद्वारे निघाले आहेत.
म्हापसा : वयाची 75 वर्षे गाठलेल्या जेष्ठ नागरिकांपासून ते 20 वर्षीय युवकापर्यंतचे 70 साईभक्त बुधवारी (6 फेब्रुवारी) शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी गोव्यातून पदयात्रेद्वारे निघाले आहेत. साई भक्त परिवारातर्फे सुरू करण्यात आलेल्या या पहिल्या आणि दीर्घ पल्ल्याच्या दुस-या पदयात्रेला म्हापसा शहरातील टॅक्सी स्थानकावर असलेल्या साई मंदिरापासून सुरुवात झाली. ही पदयात्रा शिर्डीपर्यंतचा 550 किलोमीटरचा प्रवास 15 दिवसांत पूर्ण करुन शिर्डीमध्ये पोहोचणार आहे. या पदयात्रेची सांगता 20 फेब्रुवारीला शिर्डीमध्ये दाखल झाल्यानंतर केली जाणार आहे.
टॅक्सी स्थानकावर साईंच्या आरती आणि जयजयकार केल्यानंतर यात्रेला शुभारंभ म्हापसा पालिकेतील नगरसेवक आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. 15 दिवसांच्या या प्रवासात दरदिवशी सरासरी 40 ते 50 किलोमीटर तर शेवटच्या दिवशी 15 ते 20 किलोमीटर यात्रा केली जाणार असल्याची माहिती संस्थापक प्रशांत वेर्लेकर यांनी दिली. ही पदयात्रा धारगळ मार्गे बांदा, आंबोली, गडहिंग्लज, चिकोडी-तासगाव, विटा, बारामती, दौंड-नगर ते शिर्डी असा प्रवास करणार आहे. शेवटच्या दिवशी पदयात्रा दिंडी तसेच गजराने साई मंदिरात प्रवेश करणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
संस्थेने आयोजित केलेली ही यंदाची सहावी पदयात्रा आहे. 2013 साली सुरू झालेल्या या पदयात्रेत त्यावेळी सहभागी साईभक्तांची संख्या ७ होती. आता ही संख्या सत्तरच्या घरात गेली आहे. गेल्या वर्षी सुमारे ३५ भक्त सहभागी झाले होते. काही भक्तगण वाटेत सुद्धा यात्रेत सहभागी होत असतात. त्यात गोव्यातील विविध भागातून आलेल्या साईभक्तांसोबत महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील भक्तांचा सुद्धा समावेश असल्याचे ते म्हणाले.
पूर्वी ही यात्रा सर्वात जास्त किलोमीटर अंतर पार करुन शिर्डीत जाणारी यात्रा होती; पण आता दिल्लीतून सुद्धा शिर्डीपर्यंत एक पदयात्रा येत असल्याने ही दुसरी लांब पल्ल्याची यात्रा असल्याची माहिती निलेश वेर्णेकर यांनी दिली. मात्र साईभक्त परिवार ही शिर्डीत यात्रा सुरू करणारी पहिली संस्था असल्याचा दावा यावेळी वेर्णेकर यांच्या वतीने करण्यात आला. यात्रेत पढंरीची वारी करणारे वारकरी सुद्धा समावेश होतात असेही यावेळी सांगितले.
यात्रा दरम्यान प्रत्येक ठिकाणी चांगले स्वागत तसेच केले जाते. ज्या गावात रात्रीचे वास्तव्य केले जाते त्या गावातील लोकांकडून चांगले सहकार्य सुद्धा केले जाते. काही भक्तांकडून महाप्रसाद तसेच इतर कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात. काही गावात तर गोव्यात सुद्धा वारकरी असल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त केले जात असल्याचे वेर्णेकर यांनी माहिती देऊन सांगितले.