सासष्टीला ते आवडले, पण त्यांना जवळ मात्र कधी केलेच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 05:23 PM2019-03-18T17:23:19+5:302019-03-18T17:24:22+5:30

मडगावच्या लॉयोला हायस्कुलमध्ये काही काळ शिक्षण घेतल्यामुळे असेल कदाचीत पर्रीकर यांचे सासष्टीतील कित्येक अल्पसंख्यांक समाजाच्या पुढाऱ्यांशी चांगले जमायचे.

Salctte Liked him always but never supported as he wants | सासष्टीला ते आवडले, पण त्यांना जवळ मात्र कधी केलेच नाही

सासष्टीला ते आवडले, पण त्यांना जवळ मात्र कधी केलेच नाही

googlenewsNext

- सुशांत कुंकळयेकर

मडगाव : एरवी सासष्टी आणि भाजपा यांचा एकामेकांशी छत्तीसाचा आकडा पण मनोहर पर्रीकर यांच्या प्रेमात मात्र ही सासष्टी नेहमीच पडली. असे जरी असले तरी एक दोन अपवाद वगळता सासष्टीने त्यांना जवळ मात्र कधीच केले नाही. सासष्टीत विकास कामे करुनही आपला येथे फारसा प्रभाव पडत नाही याची खंत त्यांना शेवटपर्यंत होती.


मडगावच्या लॉयोला हायस्कुलमध्ये काही काळ शिक्षण घेतल्यामुळे असेल कदाचीत पर्रीकर यांचे सासष्टीतील कित्येक अल्पसंख्यांक समाजाच्या पुढाऱ्यांशी चांगले जमायचे. हे नेते भाजपाच्या इतर नेत्यापासून दोन हात दूर राहत असत. मात्र पर्रीकरांच्या जवळ जाण्यास त्यांना कुठलाही संकोच वाटत नसे त्यामुळेच कधी मिकी पाशेको तर कधी आर्वेतान फुर्तादो, कायतु सिल्वा तर कधी बेंजामीन सिल्वा यांना जवळ करीत त्यांनी आपले सरकारही शाबुत ठेवले.


पर्रीकरांना ख्रिस्ती समाज जवळचा का मानत होता? याबद्दल एकेकाळचे त्यांचे फॅन असलेले मडगावातील प्रसिद्ध दंत वैद्य डॉ. ह्युबर्ट गोम्स सांगतात, ‘पर्रीकर हे जरी भाजपाचे नेते असले तरी अल्पसंख्यांकडे जुळवून घेण्यास त्यांना कधीही अडचण आली नाही. त्याचे कारण म्हणजे त्यांची दृष्टीच विशाल होती. त्यांनी कधीही कुणाकडे जातीय चष्म्यातून बघितले नाही. त्यामुळेच अल्पसंख्यांकानीही त्यांच्यावर विश्वास ठेवला.’ पर्रीकर यांच्या प्रेमातूनच डॉ. गोम्स यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाच्या राज्य कार्यकारिणीवर डॉ. गोम्स यांनाही घेण्यात आले होते. मात्र नंतर डॉ. गोम्स हे भाजपातून व राजकारणातून बाहेर पडले.


२००४ पासून पर्रीकरांनी सासष्टीत आपली मुळे रुजवायला सुरु केली. २००४ च्या लोकसभा निवडणूकीत सासष्टीकरांचा पाठींबा भाजपाला मिळावा यासाठी ते कित्येकांना भेटत असत. त्यात मासळीवाल्यांपासून अगदी धिरयो आयोजित करणाऱ्यापर्यंतच्या लोकांचा समावेश असायचा. मात्र तरीही त्यांना यश आले नाहीच. मात्र नंतरच्या लोकसभा निवडणूकीत भाजपाचे रमाकांत आंगले दक्षिण गोव्यातून निवडून आले. मात्र त्यात सासष्टीपेक्षा इतर मतदारसंघाचाच वाटा अधिक होता. २००७ च्या विधानसभा निवडणूकीतही सासष्टीने पर्रीकर व भाजपा या दोघांना तसे दुरच ठेवले. अपवाद होता तो केवळ फातोर्डाचा पण तरीही त्यांनी सासष्टीत बदल घडवून आणण्याचा आपला नाद कधी सोडला नाही.


२०१२ च्या विधासभा निवडणूकीत मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले. काँग्रेसला चर्चचा असलेल्या विरोधाचा फायदा उठवीत त्यांनी नावेली मतदारसंघातून आवेर्तान फुर्तादो, वेळ्ळीतून बेंजामिन सिल्वा आणि बाणावलीतून कायतु सिल्वा यांना पाठींबा देत आठ मतदारसंघापैकी केवळ दोन मतदारसंघात काँग्रेसचे अस्तित्व ठेवण्यात यश मिळवले. आणि पहिल्यांदाच सासष्टीत भाजपाचा प्रभाव दिसू लागला. याच टर्ममध्ये नावेली व बाणावलीत कोट्यवधीचे विकास प्रकल्प उभे झाले. कायतु सिल्वा म्हणतात, आमच्या बाणावलीतच त्या पाच वर्षात किमान सहाशे कोटीेंची विकास कामे मार्गी लागली.


याच कालावधीत त्यांनी निवृत्त खलाशांना व त्यांच्या विधवांना पेंशन सुरु करुन अल्पसंख्याक मतदारांना अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केला. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत मिकी पाशेको, कायतू सिल्वा आणि आवेर्तान फुर्तादो यांचा वापर करीत तसेच दुसºया बाजुने चर्चिल आलेमाव सारख्या उमेदवाराला रिंगणात उतरवून भाजपाचे उमेदवार नरेंद्र सावईकर यांचा विजय निश्चित केला. असे जरी असले तरी २०१७ च्या विधानसभा निवडणूकीत सासष्टीने भाजपाला झिडकारत आठही मतदारसंघात भाजपाला बाजूला ठेवले. आणि पर्रीकरांसाठी तो एक धक्काच ठरला.

Web Title: Salctte Liked him always but never supported as he wants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.