नोकऱ्यांची विक्री, कारवाईचा धडाका; मुख्यमंत्र्यांमुळे अद्दल, आणखी तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2024 07:50 AM2024-10-26T07:50:14+5:302024-10-26T07:51:13+5:30
काणकोण तालुक्यातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सरकारी नोकऱ्या विकणाऱ्या काही दलालांचे कंबरडे मोडण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दलालांना गजाआड करण्याचे आदेश पोलिसांना दिले व त्यामुळे पोलिसही कामाला लागले आहेत. सरकारी नोकरीच्या आमिषाने पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्यांविरोधात राज्यभर कारवाई सुरू झाली आहे. काल काणकोण तालुक्यातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणूक प्रकरणात पोलिसांनी काही जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत तर काही जण अंडरग्राऊंड झाले आहेत, अशी माहिती मिळते. प्रियोळ मतदारसंघातील एकाने तक्रार केल्यानंतर जुने गोवे येथील पूजा नाईक हिला अटक करण्यात आली. खरे म्हणजे पूजाला पूर्वीदेखील मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या तक्रारीनंतरच अटक झाली होती.
साखळीतील मुख्यमंत्र्यांच्या घरी एकदा पूजा नाईक ही कुणाला तरी नोकरी देण्याचा विषय घेऊन आली होती. त्यावेळीच मुख्यमंत्र्यांना संशय आल्याने त्यांनी तक्रार केली होती. नंतर तिला अटकही झाली होती. मात्र, लोक अजूनही तिच्यावर विश्वास ठेवून नोकरी मिळावी म्हणून पैसे देत होते. तिचे कारनामे सुरूच राहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना कडक सूचना केल्या. पूजा नाईक हिची सर्व नोकरी विक्रीप्रकरणे बाहेर काढण्याचे स्वातंत्र्य पोलिसांना दिले गेले आहे. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. पूजाने खरेदी केलेल्या कारही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
राज्यातील अन्य काही व्यक्तींनीही सरकारी नोकरी देतो, असे सांगून लोकांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. काणकोण तालुक्यातील काही जणांवर पोलिसांची नजर आहे. पोलिसांनी काल तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला.
नोकऱ्या विक्रीच्या कामात दलाल म्हणून वावरणारे काही जण यामुळे हादरले आहेत. सध्या होणाऱ्या कारवाईमुळे काही जणांना तरी अद्दल घडली आहे, असे लोक म्हणत आहेत.