गोव्याच्या किनाऱ्यावर राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांकडून स्वच्छता मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 01:51 PM2019-09-23T13:51:07+5:302019-09-23T13:57:52+5:30
गोव्याच्या किनाऱ्यावरील अस्वच्छता तसेच बीच क्लिनिंग कंत्राटाचे प्रकरण गाजत असतानाच सीएसआयआर- एनआयओ (राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था) यांनी करंजाळे किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम हाती घेतली.
पणजी: गोव्याच्या किनाऱ्यावरील अस्वच्छता तसेच बीच क्लिनिंग कंत्राटाचे प्रकरण गाजत असतानाच सीएसआयआर-एनआयओ (राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था) यांनी करंजाळे किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम हाती घेतली. या मोहिमेत शास्त्रज, विद्यार्थी मिळून १३० जण सहभागी झाले होते.
करंजाळेच्या एक किलोमीटर किनारपट्टीवरील सुमारे १०७८ किलो प्लास्टिक कचरा, ४८० किलो सेंद्रिय कचरा, कागद, ७२० काचेच्या बाटल्या १२५ धातूचे कॅन गोळा करण्यात आले. हा कचरा नंतर महापालिकेच्या स्वाधीन करण्यात आला. महापालिकेच्या ट्रकांमधून तो अन्यत्र हलविण्यात आला.
एनआयओचे संचालक सुनील कुमार सिंह यांच्या हस्ते साफसफाई मोहीम सुरू झाली. एनआयओचे शास्त्रज्ञ डॉ. मोहन सहा, डॉ. राकेश शर्मा तसेच महापालिकेचे ग्रेगरी जेकीस यावेळी उपस्थित होते. प्लास्टिक कचरा विल्हेवाटीसाठी योग्य व्यवस्थापन नसल्याने जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे मोठी समस्या निर्माण झाली आहे, असे मत शास्त्रज्ञांनी यावेळी व्यक्त केले.
या मोहिमेत प्लास्टिकच्या बाटल्या, त्यांची बुचे, प्लास्टिकची पाकिटे, दूधाची पाकिटे, अन्नपदार्थांचे पाकिटे, टूथपेस्टची रिकामी वेष्टने, प्लास्टिक स्ट्रॉ, टूथ ब्रश, प्लास्टिक जाळी, प्लास्टिक चमचे, प्लास्टिक कप काचेच्या बाटल्या, प्लास्टिक खेळणी आदी २० प्रकारच्या वेगवेगळ्या टाकाऊ वस्तू संकलित करण्यात आल्या. प्लास्टिक कचऱ्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर होतो हा संदेश देण्यासाठी शास्त्रज्ञांनी कचरा संकलन केले. त्यादृष्टीने जागृतीची गरज असल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले.