भाजपची डिचोलीतील धुरा संजय शेट्येंकडे; अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 03:09 PM2023-02-25T15:09:41+5:302023-02-25T15:11:04+5:30

माजी जिल्हा परिषद सदस्य व सामाजिक कार्यकर्ते संजय शेट्ये यांनी हजारो कार्यकर्त्यांसह भाजप प्रवेश केला.

sanjay shetye joined goa bjp along with thousands of workers | भाजपची डिचोलीतील धुरा संजय शेट्येंकडे; अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये दाखल

भाजपची डिचोलीतील धुरा संजय शेट्येंकडे; अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये दाखल

googlenewsNext

डिचोली: डिचोली मतदारसंघातील भाजपची सूत्रे एकप्रकारे अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्याच ताब्यात आली. काल त्यांचे बंधू संजय शेट्ये यांनी भाजपमध्ये रितसर प्रवेश केला. माजी आमदार राजेश पाटणेकर यांनीही शेट्ये यांचे नेतृत्व मान्य सहमती दर्शवली. डिचोलीत यामुळे आमदार शेट्ये यांचे स्थान बळकट झाले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही तसेच सूचित केले.

माजी जिल्हा परिषद सदस्य व सामाजिक कार्यकर्ते संजय शेट्ये यांनी काल हजारो कार्यकर्त्यांसह भाजप प्रवेश केला. डिचोली येथील झांट्ये सभागृहाच्या खुल्या जागेत हा प्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, माजी सभापती राजेश पाटणेकर आमदार प्रेमेंद्र शेट, डिचोली नगराध्यक्ष कुंदन फळारी, मंडळ अध्यक्ष विश्वास गावकर, डॉ. शेखर साळकर, तुळशीदास परब, वल्लभ साळकर, डॉ. कौस्तुभ पाटणेकर नगरसेवक नीलेश टोपले, अनिकेत चणेकर, रंजना वायंगणकर, दीपा पळ, राजाराम गावकर, रियाज बेग, तनुजा गावकर, कमलेश तेली, विजयकुमार नाटेकर, शर्मिला पळ, अरुण नाईक, विठ्ठल करमरकर, अर्जुन माळगावकर, संकरिता देसाई, सुबत्ता सामंत, नाझीम शेख, तुळशीदास गावकर, दीपा पळ यांच्यासह विविध पंचायतींचे सरपंच, पंच व कार्यकर्ते उपस्थित होते.

डिचोलीत प्रशासकीय प्रकल्प उभारण्याचे स्वप्न लवकर पूर्ण करणार, अग्निशमन दल, कदंब स्थानक पूर्ण करणार आहे. भाजपची ताकद डिचोलीत वाढली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तालुक्यातून ८० टक्के मतदान मिळणार व दोन्ही जागांवर भाजप विजयी होणार, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी भाजप देश व राज्य पातळीवर महान सेवा कार्य करत असल्याचे सांगितले. डॉ. सावंत हे गोव्याचा कायापालट करीत आहेत. त्यामुळे भाजप हा सर्व मान्य पक्ष बनला आहे. अपक्ष आमदार डॉ. शेट्ये यांचे भाजपला समर्थन असल्याचे सांगत म्हादईबाबत सरकार ठाम असून मुख्यमंत्री व सरकार योग्य पद्धतीने पुढे जात असल्याचे सांगितले.

भाजपात प्रवेश केलेले संजय शेट्ये यांनी पंतप्रधान मोदी तसेच मुख्यमंत्री डॉ. सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपला पूर्ण सहकार्य देताना डिचोली मतदारसंघात पक्षाला नवी शक्ती देणार असल्याचे सांगितले. आमदार प्रेमेंद्र शेट, माजी सभापती राजेश पाटणेकर, कुंदन फळारी यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी माजी शिवसेना नेते रमेश नाईक यांचा तसेच अनेक सरपंच पंच तसेच असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश देण्यात आला. स्वागत मंडल अध्यक्ष विश्वास गावकर यांनी केले. सूत्रसंचालन राजन कडकडे यांनी केले. अरुण नाईक यांनी आभार मानले.

डिचोलीतील बेरोजगारी संपवू

डिचोली तालुक्यात किमान हजारभर लोकांना रोजगार उपलब्ध करणारे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. तसेच नवीन सरकारी नोकऱ्या उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरु करणार. डिचोलीवासीयांनी विकासाच्या बाबतीत भिवपाची गरज नाही. पायाभूत विकास व मानवी विकास साधण्यासाठी सरकार कार्यरत आहेत. आज डिचोलीत अपेक्षित विकास झालेला नाही. असे स्पष्ट करताना यापुढे विकासाची नवी उंची गाठण्यासाठी अनेक प्रकल्प राबवणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

काँग्रेसलाच म्हादई विकायची होती

२०१२ च्या पूर्वी काँग्रेस पक्षाची नीती म्हादई विकायची होती. त्यांची सर्व पापे लवकरच बाहेर येतील. आज आम्ही म्हादई रक्षणासाठी सर्व बाबतीत पुढाकार घेतलेला असून केंद्राचा आम्हाला पाठिंबा आहे. आम्ही निश्चित म्हादईची लढाई जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: sanjay shetye joined goa bjp along with thousands of workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.