संजीवनी कारखाना एका वर्षात सुरु होणार, मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
By पूजा प्रभूगावकर | Published: January 9, 2024 01:25 PM2024-01-09T13:25:58+5:302024-01-09T13:26:47+5:30
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन मागे
पणजी: संजीवनी साखरकारखाना पुढील एका वर्षात सुरु केला जाईल या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर मंगळवारी पणजी येथील आझाद मैदान येथे सुरु केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
दरम्यान सरकारने संजीवनी साखर कारखान्याच्या पुनर्विकासासाठी डिझाइन-बिल्ड-फायनान्स-ऑपरेट-हस्तांतरण या पीपीप तत्त्वावर निविदा सरकारने जारी केली आहे. बंद असलेला संजीवनी कारखाना पुन्हा सुरु करा, इथेनॉल प्रकल्प सुरु करा या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साेमवारी पणजीत धडक दिली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या आल्तीनो येथील निवासस्थानावर जाणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले होते.
मात्र मागणी मान्य झाल्याशिवाय जाग्याहून हलणार नाही असे स्पष्ट करुन या शेतकऱ्यांनी सोमवारी रात्री आझाद मैदानावरच ठाण मांडला. अखेर मंगळवारी सकाळी गोमंतक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅनरखाली शेतकऱ्यांनच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची आल्तीनो येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुढील वर्षापासून संजीवनी कारखाना पुन्हा सुरु करण्याचे आश्वासन दिले.