गोव्याच्या संजीवनी साखर कारखान्यात 58 हजार क्विंटल साखर विक्रीसाठी पडून
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 02:49 PM2018-11-29T14:49:39+5:302018-11-29T14:53:30+5:30
गोव्यात सहकार क्षेत्रातील एकमेव असलेला संजीवनी सहकारी साखर कारखाना अस्तित्वासाठी झुंज देत असतानाच या कारखान्यात सुमारे 58 हजार 336 क्विंटल साखर विक्रीविना पडून असल्याची माहिती हाती आली आहे.
पणजी - गोव्यात सहकार क्षेत्रातील एकमेव असलेला संजीवनी सहकारी साखर कारखाना अस्तित्वासाठी झुंज देत असतानाच या कारखान्यात सुमारे 58 हजार 336 क्विंटल साखर विक्रीविना पडून असल्याची माहिती हाती आली आहे.
धारबांदोडा तालुक्यातील दयानंद नगर येथे असलेला 46 वर्षे हा जुना कारखाना सध्या अस्तित्वासाठी झुंज देत आहे. राजकारण्यांची सहकार क्षेत्राकडील अनास्था तसेच या साखर कारखान्याकडे झालेले दुर्लक्ष यामुळे या कारखान्यातून फारसे मोठे उत्पन्न सरकार येऊ शकले नाही. गेल्या 46 वर्षांच्या काळात नेहमीच तोटा होत राहिला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कारखान्याच्या ठिकाणी झालेले हवा आणि पाणी प्रदूषणाची गंभीर दखल घेऊन राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ हा कारखाना बंद करण्याचा आदेश दिला होता या पार्श्वभूमीवर राज्यातील ऊस उत्पादकांचे मोठे संकट निर्माण झाले आहे. संजीवनी सहकारी साखर कारखान्याला ऊस गेला नाही तर पाठवायचा कुठे? असा प्रश्न उत्पादकांसमोर आहे. या शेतकऱ्यांनी ऊस लागवड केलेली आहे.
मध्यंतरी या कारखान्यातील मळीपासून वीज निर्मितीचा प्रस्ताव होता परंतु तोही बारगळला. कारखाना नफ्यात आणण्यासाठी तसेच कारखान्यात सुधारणा घडून आणण्यासाठी कोल्हापूरच्या तज्ञ मंडळींना आणले परंतु त्यांनी केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी सरकार करू शकले नाही. या भागाचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेऊन 5 डिसेंबरपर्यंत कारखाना सुरू करण्याबाबत सरकारने पाऊल उचलले नाही तर लोकांना घेऊन रस्त्यावर येण्याचा इशारा दिला आहे. गावकर हे अपक्ष असले तरी सध्या सरकार बरोबर आहेत आणि सरकारला त्यांनी हा इशारा दिला आहे.
गळीत हंगाम सुरू व्हायला हवा होता परंतु तो सुरू होऊ शकलेला नाही. ऑक्टोबर आणि जवळपास नोव्हेंबर असे दोन महिने उलटल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी मोठे आंदोलनही करून महामार्ग रोखण्याचा इशारा दिला. गेल्या मोसमात या कारखान्याला सुमारे 8 कोटी रुपये तोटा झाला. सरकार आणि कारखाना यांच्यातील समन्वयाअभावी साखरी विक्रीविना पडून राहिली. कारखान्यात तांत्रिकी बिघाडाचे प्रकार सर्रास घडू लागले होते. गेल्या गळीत हंगामात मध्यंतरी कंडेन्सर पंप निकामी झाल्याने तीन दिवस कारखाना बंद ठेवावा लागला होता. त्यामुळे उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कंडेन्सर पंप दुरुस्त करण्यास स्थानिक अभियंत्यांना अपयश आल्याने अखेर पुणे येथील वसंतदादा साखर कारखान्यातून तज्ञांना पाचारण करावे लागले होते
गेल्या नोव्हेंबरमध्ये 20 दिवस कारखाना बंद होता ऊस कापून कारखान्यासाठी पाठवला होता परंतु तो पडून राहिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अधिकृत माहितीनुसार गेल्या वर्षी गळीत हंगामात सुमारे 59,790 मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले. यात 34,766 मेट्रिक टन ऊस गोव्याचा तर 26,046 मेट्रिक टन ऊस शेजारी राज्यातील होता. कारखान्यातील यंत्रसामुग्री इतकी जुनी झाली आहे की त्याच्या देखभालीवरच वर्षाकाठी सुमारे 2 ते 2.5 कोटी रुपये खर्च येतो.