'संजीवनी'ला पुन्हा संजीवनी नक्की: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2024 10:43 AM2024-05-05T10:43:28+5:302024-05-05T10:44:50+5:30
दयानंदनगर धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्याला भेट देऊन पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क उसगाव : संजीवनी सहकारी साखर कारखान्याला पुन्हा संजीवनी नक्की देण्यात येईल, त्यासाठी ऊस पीक वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. दयानंदनगर धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्याला भेट देऊन पाहणी केली.
कुळे येथील दूधसागर धबधबा वाहतूक करणाऱ्या भाडोत्री जीप वाहतुकीचे दर, तसेच खनिज मालवाहू टिप्पर ट्रकमालकांच्या समस्या यावर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासनही सावंत यांनी दिले. यावेळी आमदार गणेश गावकर, दक्षिण जि.पं. सदस्या सुवर्णा तेंडुलकर, सावर्डे मतदारसंघ भाजपा मंडळाचे अध्यक्ष विलास देसाई, धारबांदोडा पंचायतीचे सरपंच बालाजी ऊर्फ विनायक गावस, जिल्हा पंचायत सदस्य सुधा गावकर उपस्थित होत्या. यावेळी संजीवनी साखर कारखान्याचे कामगार, खनिज ट्रकमालक आदी उपस्थित होते.
पर्यटक वाहतूक दरासंदर्भातही निर्णय होणार
दूधसागर धबधब्यावर पर्यटकांची वाहतूक करणाऱ्या भाडोत्री जीप वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात धुळीची समस्या निर्माण झाली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी २३ कोटी रुपये खर्च करून पक्का रस्ता करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे; परंतु सध्या हे प्रकरण न्यायालयात असल्याने रस्ता काम स्थगित ठेवण्यात आले आहे. पर्यटक वाहतूक दरासंदर्भात निर्णय आचारसंहिता संपल्यावर घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.