पुढील विधानसभेसाठी संकल्पलाच भाजपचे तिकीट: मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2024 01:46 PM2024-05-02T13:46:32+5:302024-05-02T13:48:28+5:30
बायणातील जाहीर सभेत घोषणा, बंजारा समाजाचाही पाठिंबा
लोकमत न्यूज नेटवर्क वास्को : आमदार संकल्प आमोणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मुरगाव मतदारसंघात मोठा विकास होण्यास सुरुवात झाली असून भविष्यातही मुरगाव मतदारसंघाचा चौफेर विकास होणार आहे. पुढील तीन वर्षांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा आमोणकर हे मुरगाव मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावरून निवडणूक लढवणार, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
बायणा येथे झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. बुधवारी (दि.१) संध्याकाळी मुरगाव मतदारसंघातील बायणा येथील शाफी मसजित जवळ दक्षिण गोवा भाजप लोकसभा उमेदवार पल्लवी धेंपे यांच्या झालेल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री सावंत यांनी शेकडो नागरिकांना संबोधित केले. यांवेळी त्यांच्याबरोबर व्यासपिठावर आमदार संकल्प आमोणकर, दक्षिण गोवा भाजप उमेदवार पल्लवी धेपे, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे महासचिव अॅड. पंडीत राठोड आणि इतर भाजप नेते उपस्थित होते. तीन वर्षानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संकल्प आमोणकर मुरगाव मतदारसंघातून भाजपवरून निवडणूक लढविणार असल्याचे भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
समुद्रकिनाऱ्यांवरील किनाऱ्यांना मिळणार अभय
यावेळी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी भाजप सरकारमुळे मुरगाव मतदारसंघात मोठा विकास झाल्याचे सांगितले. मुरगाव मतदारसंघातील बायणा समुद्र किनाऱ्यावर असलेल्या अनेक घरमालकांना त्यांची घरे भविष्यात जमिनदोस्त होण्याची भीती असते. मात्र गोव्यात जोपर्यंत मुख्यमंत्री सावंत यांचे सरकार आहे, तो पर्यंत येथील घरांना धोका निर्माण होणार नसल्याचे आमोणकर यांनी सांगितले. यावेळी भाजप उमेदवार पल्लवी धेंपे आणि इतर मान्यवरांची भाषणे झाली.