शांततेचा व एकात्मतेचा संदेश घेवून आला सांताक्लॉज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 07:12 PM2018-12-25T19:12:43+5:302018-12-25T19:13:19+5:30
जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे... शांततेचा व एकात्मतेचा संदेश घेवून येणा-या सांताक्लॉजने तयार झालेली वातावरणाची निर्मिती नवीन वर्षापर्यंत कायम राहणार आहे.
म्हापसा : जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे... शांततेचा व एकात्मतेचा संदेश घेवून येणा-या सांताक्लॉजने तयार झालेली वातावरणाची निर्मिती नवीन वर्षापर्यंत कायम राहणार आहे. समाजातील प्रत्येक लोक या आनंद देणा-या सणात सहभागी होत असतात.
नाताळादिवशी मध्यरात्री येशू ख्रिस्ताच्या जन्मानिमित्त चर्चमध्ये प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले होते. विविध चर्चच्या परिसरात नाताळानिमित्त विशेष सांस्कृतिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात लहानांपासून थोरापर्यंतचे लोक सहभागी झाले होते. कार्यक्रमानंतर सर्वांना सांताक्लॉजच्या हस्ते मिठाईचे तसेच खाऊचे वाटपही करण्यात आले. यावेळी जमलेल्या लोकांनी एकमेकांना शुभेच्छा देवून आनंदोत्सव साजरा केला. गावातील प्रत्येक चर्चच्या आवारात पुढील सात दिवस अशा प्रकारच्या कार्यक्रमाची रेलचेल सुरुच असते. नवीन वर्षाच्या आगमानंतर ती संपून जाते. अशा प्रकारचे हे कार्यक्रम रात्री उशीरापर्यंत सुरुच असतात. त्यानंतर संगीत रजनीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
गोव्यातील ब-याच गावात प्रचलीत असलेल्या प्रथेनुसार गावागावात एकात्मतेचे दर्शन या सणातून प्रदर्शित केले जाते. ज्या प्रमाणे हिंदू समाजातील लोक चतुर्थी तसेच दिवाळीच्या सणाला इतर समाजातील लोकांना खाद्य पदार्थाचे वाटप करतात त्याच प्रमाणे ख्रिस्ती बांधव सुद्धा नाताळ सणाला इतर समाजातील लोकांना गोड पदार्थाचे वाटप करतात. यात धोदोल, बिबींका, करंज्या या पारंपारिक खाद्या सोबत फळांचा चॉकलेट्सचा समावेश असतो. तसेच सणानिमित्त एकमेकांच्या घरी जावून त्यांना शुभेच्छा देतात तसेच सणातील आनंदात सहभागी होत असतात.
गावातील प्रत्येक घरात तसेच चर्चच्या आवारात लक्षवेधक असे देखावे करण्यात आलेले आहेत. या गोठ्यांना अत्याधुनिकते बरोबर पारंपारिकतेची झलक सुद्धा देण्यात आलेली आहे. तसेच त्याला विद्युत रोषणाईची झलक सुद्धा देण्यात आली आहे. येशू ख्रिस्ताचा जन्म दर्षवणा-या या देखाव्यांची राज्य पातळीवर तसेच ग्रामीण पातळीवर स्पर्धाही भरवल्या आहेत. त्यात संबंधीत आमदारांनी सुद्धा पुढाकार घेवून त्यांना आकर्षक अशी बक्षीसे सुद्धा ठेवण्यात आलेली आहेत. देखाव्या बरोबर पारंपारिक नक्षत्रांच्या स्पर्धाही भरवल्या आहेत.