सार्दिनची अखेरची निवडणूक?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2024 11:42 AM2024-03-13T11:42:36+5:302024-03-13T11:43:08+5:30
भाजपविरुद्ध आपण लढतोय असे चित्र अनेकदा गोवा फॉरवर्ड पक्ष उभे करत असतो
भाजपविरुद्ध आपण लढतोय असे चित्र अनेकदा गोवा फॉरवर्ड पक्ष उभे करत असतो, विधानसभेत आमदार विजय सरदेसाई यांची कामगिरी प्रभावी असते, चांगली असते. काही मंत्र्यांना शिंगावर घेण्याची विजयची भूमिका लोकांना आवडते. त्यांची आक्रमक शैली, अभ्यासू वृत्ती, इंग्रजीवरील प्रभुत्व आणि लोकांच्या प्रश्नांची नेमकी समज या सरदेसाई यांच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र, अलीकडे त्यांनी काँग्रेस पक्षासोबत खेळ मांडण्याची जी भूमिका घेतलीय, ती आश्चर्यकारक आहे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या संभाव्य उमेदवारीला विजय मोठा विरोध करतात. सरदेसाई यांनी जाहीरपणे सार्दिनना विरोध केला आहेच, मग विजयला उमेदवार म्हणून कोण हवा आहे, असा प्रश्न येतो, गिरीश चोडणकर यांना ते उमेदवार म्हणून अनुकूल आहेत काय? चोडणकर यांची अलीकडची विधाने जर पाहिली तर ते आता सरदेसाई यांना आपला राजकीय शत्रू मानत नाहीत, हे लोकांच्या लक्षात येते.
सार्दिन आणि चोडणकर यांच्यात दक्षिण गोव्याच्या तिकिटासाठी स्पर्धा आहे. काँग्रेसने तिकीट दिले तर मी यावेळी शेवटची लोकसभा निवडणूक लढवीन असे ७७ वर्षीय सार्दिन सांगत आहेत. वास्तविक सार्दिन आता शरीराने थकले आहेतच. तरीदेखील त्यांचा खिस्ती व हिंदू मतदारांशी अजून कनेक्ट आहे. मात्र २०१९ ची लोकसभा निवडणूक वेगळी होती आणि आता २०२४ ची निवडणूक वेगळी आहे. २०१९ साली दिगंबर कामत, बाबू कवळेकर, रवी नाईक हे सगळे काँग्रेसमध्ये होते आणि सुदिन ढवळीकर व रमेश तवडकर हे देखील त्यावेळी भाजपच्या विरोधात होते. आता ते सगळे भाजपसोबत आहेत.
आता काँग्रेसला आपला उमेदवार कदाचित बदलावा लागेल, तरीदेखील सरदेसाई यांनी जर गिरीश चोडणकर किंवा अन्य कुणाला उमेदवार म्हणून मान्य केले नाही व आपलेच राजकारण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला तर विजयकडून काँग्रेसची जाणीवपूर्वक हानी केली जात आहे, असे लोक बोलतील. सार्दिन यांना तिकीट देऊ नका, त्यांना तिकीट दिले तर आम्ही तुमच्यासोबत नाही, असा संदेश विजय काँग्रेसला वारंवार देत आहेत. २०१७ सालच्या विधानसभा निवडणूक निकालानंतरही विजय सरदेसाई यांनी असाच पवित्रा घेतला होता. लुईझिन फालेरो मुख्यमंत्रिपदी नकोत, दिगंबर कामत यांना मुख्यमंत्री करा, असे विजयचे म्हणणे होते, मग त्यांनी थेट भाजपच्याच होडीत उडी टाकली आणि मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली जबरदस्तीने भाजपचे सरकार अधिकारावर आणले होते.
गोवा फॉरवर्डकडे त्यावेळी तीन आमदार होते. त्यामुळे विजयचे महत्त्व वाढले होते. गोवा फॉरवर्डचे २०१७ सालचे तेच जुने महत्त्व किंवा वजन आता राहिलेले नाही. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांची शक्ती अजून दक्षिण गोव्यात बऱ्यापैकी आहे. सरदेसाई यांचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्याशीही पटत नाही. माणिकराव ठाकरे यांनी परवा सरदेसाई यांना चर्चेसाठी बोलावले. ते ठाकरे यांना भेटून आले. सरदेसाई यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला तरच दक्षिण गोव्यात काँग्रेसचा उमेदवार जिंकेल, अशी स्थिती नाही. विजयने निदान भाजपला मदत करू नये एवढीच कदाचित काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाची अपेक्षा असेल, सरदेसाई यांचे पूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी जेवढे शत्रुत्व होते तेवढे आता राहिलेले नाही, सरदेसाई यांच्याकडे प्रभावी व चांगले राजकारण करण्याची क्षमता आहे, कौशल्य आहे; पण त्यांचे राजकारण अलीकडे काँग्रेसची कोंडी करणे एवढ्यापुरतेच राहिले आहे की काय असा प्रश्न पडतो.
सार्दिन यांना तिकीट द्यायला नको, तर कुणाला द्यावे ते जाहीरपणे सरदेसाई यांनी सांगायला हवे. वास्तविक सरदेसाई यांचा पक्ष व काँग्रेस, आप हे सगळे एकत्र राहिले तर भाजपला थोडी टक्कर देऊ शकतील, काँग्रेसने गिरीश चोडणकर यांना तिकीट दिले तर विजयचा प्रश्न सुटेल काय हेही पाहावे लागेल, चोडणकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी चालवली आहेच, दक्षिणेत यावेळी गिरीशच्या रूपात हिंदू उमेदवार देण्याची चाल काँग्रेस पक्ष खेळला तर मतदार कसा प्रतिसाद देतील तेदेखील पाहावे लागेल, भाजप सध्या दक्षिणेत पूर्णपणे गोंधळात सापडलेला आहे. त्यांचाही उमेदवार ठरत नाही. अशावेळी काँग्रेस, विजय आणि आप यांनी मिळून नीट रणनीती आखली तर भाजपच्या अडचणी आणखी वाढू लागतील.