दक्षिणेची चावी 'सासष्टी'कडे नाही! अॅड. नरेंद्र सावईकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 01:54 PM2023-12-19T13:54:00+5:302023-12-19T13:55:58+5:30

भाजपसाठीच अनुकूल स्थिती असल्याचा दावा.

sasashti does not the key factor to the south goa lok sabha said narendra sawaikar | दक्षिणेची चावी 'सासष्टी'कडे नाही! अॅड. नरेंद्र सावईकर 

दक्षिणेची चावी 'सासष्टी'कडे नाही! अॅड. नरेंद्र सावईकर 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाची चावी आता सासष्टी तालुक्याकडे राहिलेली नाही. या मतदारसंघात भाजपला अत्यंत अनुकूल स्थिती आहे. काँग्रेसमधून फुटून भाजपवासी झालेल्या आमदारांमुळे भाजपला अतिरिक्त मते मिळतील, असा दावा 'भाजप'चे इच्छुक उमेदवार अॅड. नरेंद्र सावईकर यांनी केला.

'लोकमत' कार्यालयास सोमवारी (दि. १८) दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी ते बोलत होते. फुटीर काँग्रेसी आमदारांचा यावेळी भाजप उमेदवाराला किती फायदा होणार? सासष्टीत आलेक्स सिक्वेरा यांच्या रूपाने भाजपने ख्रिस्ती मंत्री दिल्याने त्याचा येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला किती फायदा होणार, असा प्रश्न केला असता त्यांनी वरील उत्तर दिले. भाजपची स्वतःची ताकद आहेच शिवाय काँग्रेसमधून आलेले आमदारही भाजपसाठी मते आणतील, असे ते म्हणाले.

भाजपने ख्रिस्ती उमेदवार दिला तर? असा प्रश्न केला असता अॅड. सावईकर म्हणाले की, विल्फ्रेड मिस्किता यांना तिकीट देऊन पक्षाने हा प्रयोग करून पाहिला आहे. उत्तर गोव्यापेक्षा दक्षिण गोव्यातील स्थिती वेगळी असली तरी येथे खिस्ती उमेदवार देऊन फायदा होतोच, असे नाही, हे सिद्ध झालेले आहे. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात २ लाख ४० हजार खिस्ती, सुमारे ८५ हजार मुस्लीम व २ लाख ९० हजारच्या आसपास हिंदू मतदार असल्याची माहिती त्यांनी दिली. दक्षिण गोव्यात काँग्रेसची पारंपरिक मते आहेत. परंतु या पक्षाचा उमेदवार निवडणूक जिंकू शकणार नाही. कारण, समीकरणे बरीच बदलली आहेत. भाजपची ताकद दक्षिणेत वाढलेली आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या ९,५०० मतांनी पराभव पत्करावा लागला तरी मी फिल्डवर माझे काम चालूच ठेवले आहे, असे सावईकर म्हणाले. २०१४च्या निवडणुकीत ३२ हजार मतांचे मताधिक्य आपण मिळवले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली.

केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात. विश्वकर्मा योजनेत राज्यात २२ हजार वेगवेगळ्या व्यावसायिकांची नोंदणी केली जाणार आहे. भाजप कोणत्याही योजनेत किंवा अन्य बाबतीत अल्पसंख्याकांबाबत कोणताही पक्षपात करत नाही, असे ते एका प्रश्नावर म्हणाले. करण्या साठी सावंत सरकार आटोकाट प्रयत्न करीत आहे. नऊ खाण ब्लॉक्सचा लिलावही झालेला आहे. खाणी लवकरच सुरू होतील, असा विश्वास सावईकर यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना व्यक्त केला.

तिकीटावर दावा केला नाही

माजी खासदार तथा एनआरआय आयुक्त असलेले अॅड. सावईकर यांना तुम्ही भाजपच्या तिकिटासाठी दावा करणार का?, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, २००९ साली मला तिकीट दिली तेव्हा मी उमेदवारीचा विचारही केला नव्हता. पर्रीकरांनी फोनवरून मला माहिती दिली तेव्हा मी कोर्टात होतो. मी त्यावेळी प्रॅक्टिस करायचो. अनपेक्षितपणे त्यावेळी मला पहिल्यांदा तिकीट मिळाले. परंतु त्यानंतर २०१४ मध्ये मी खासदार म्हणून निवडून आलो, भाजपचे रमाकांत आंगले व मी मिळून आम्ही दोघेजण दक्षिण गोव्यात याआधी भाजपचे खासदार झालेलो आहोत. आतादेखील मी तिकिटावर दावा करण्याचा किंवा ती मागण्याचा प्रश्न नाही. पक्ष जी जबाबदारी देईल, ती स्वीकारण्याची माझी तयारी आहे. १९९७ पासून २००७ पर्यंत मी पक्षाचा प्रदेश सरचिटणीस होतो. त्यानंतर २०१४ मध्ये खासदार झालो. एवढ्या वर्षांचे माझे काम आहे. पक्ष योग्य तो निर्णय घेईल, असे मला वाटते.

८,५०० खलाशांना सुखरूपपणे आणले

कोविड महामारीच्या काळात एनआरआयची खरी सत्त्वपरीक्षा ठरल्याचे सांगून सावईकर म्हणाले की, त्यावेळी आखातात अडकलेल्या सुमारे ८,५०० खलाशांना सुखरूपपणे गोव्यात आणण्याचे काम आयुक्तालयाने केले. रशिया-युक्रेन युद्धाच्यावेळी २१ गोवेकरांना सुखरूप परत आणले.

२३५ प्रकल्प आणले

२०१४ मध्ये निवडून आल्यानंतर खासदार निधीतून तसेच अन्य माध्यमांतून २३५ प्रकल्प आपण आणल्याचे सावईकर यांनी सांगितले. मडगाव रेल्वे स्थानकात सौरऊर्जा प्रकल्प आणला. या प्रकल्पामुळे उत्कृष्ट रेल्वे स्थानकाचा पुरस्कार अलीकडेच देण्यात आला. मतदारसंघात अनेक मैदाने बांधली. खोला, काणकोण गाव दत्तक घेऊन तेथे घरांना वीज दिली. सर्वच कामे खासदार निधीतून होतात, असे नाही. जुवारी कंपनीकडून सीएसआरखाली मदत घेऊन बार्से येथे ४० ते ४५ घरांना पिण्याचे पाणी दिले, असे ते म्हणाले.

या प्रकल्पांची गरज

रेल्वे दुपदरीकरणासाठी आता विशेष विरोध राहिलेला नाही. बाणावलीत काम सुरू झालेले आहे. काही विघ्नसंतोषी मंडळी आंदोलने वगैरे उभारतात. परंतु लोकांना आता कळून चुकले आहे, असे सावईकर म्हणाले, तामनार वीज प्रकल्प ही गोव्याची गरज आहे. कोणत्याही प्रकल्पाच्या
आधारावर केलेले राजकारण फार काळ टिकत नाही, असे ते म्हणाले.

 

Web Title: sasashti does not the key factor to the south goa lok sabha said narendra sawaikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.