राज्यात २१ व २२ रोजी आध्यात्मिक गुरु राजिंदर सिंह यांचे सत्संग
By समीर नाईक | Published: February 19, 2024 04:38 PM2024-02-19T16:38:41+5:302024-02-19T16:39:42+5:30
आध्यात्मिक गुरु परम संत राजिंदर सिंहजी महाराज यांचा दोन दिवसीय सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
समीर नाईक, पणजी: सावन कृपाल रूहानी मिशनतर्फे राज्यात आध्यात्मिक गुरु परम संत राजिंदर सिंहजी महाराज यांचा दोन दिवसीय सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम बुधवारी दि. २१ व २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये होणार आहे, अशी माहिती मिशनचे,महाराष्ट्र - गोवा प्रदेशचे प्रभारी महेश अंबानी यांनी दिली.
पणजीत आयोजित पत्रकार परीषदेत अंबानी यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश समन्वयक जितेंद्र भाटिया,गोवा केंद्राचे अध्यक्ष वॉल्टर फर्नांडिस, राष्ट्रीय प्रसारमाध्यम समन्वयक सौरभ नरुला व नवी मुंबई केंद्राचे अध्यक्ष विनोद शर्मा उपस्थित होते.
ध्यानधारणा,शाकाहार,निस्वार्थ सेवा आणि सकारात्मक अध्यात्म वाद या चार सुत्रीला अनुसरून हा सत्संग कार्यक्रम होणार आहे. गोव्यात हा पहिलाच कार्यक्रम आहे. हा सत्संग सर्व धर्मियांसाठी खुला असणार आहे. महाराज स्वतः शास्त्रज्ञ असल्याने अध्यात्म व विज्ञान यांचा मेल साधून ते लोकांशी संवाद साधतात, तसेच जीवन सकारात्मकरित्या कसे जगता येईल,याबाबत मार्गदर्शन करतात. महाराजांचे दर्शन या निमित्ताने लोकांना होणार आहे. सदर सत्संगमध्ये मोफत प्रवेश असणार आहे, असे अंबानी यांनी यावेळी सांगितले.
सावन कृपाल रूहानी मिशन चे जगभरात ३२०० केंद्र आहे त्यांचे भारतातील मुख्य कार्यालय विजय नगर, दिल्ली येथे व आंतरराष्ट्रीय कार्यालय नेपर विले, शिकागो, अमेरिका येथे आहे. राज्यात होणाऱ्या या सत्संगला आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांचे शिष्य उपस्थित राहणार आहे. यामध्ये प्रामुख्याने अमेरीका, जर्मनी, कोलंबीया, न्यू यॉर्क यासारख्या देशांचा समावेश आहे. जगभरातील विविध ५५ भाषांमध्ये त्यांची पुस्तके व लेख प्रसिद्ध झाले आहे विविध देशातील पाच सन्माननीय डॉक्टरेट्स पदवी व विविध प्रशस्ती पत्राद्वारे जगभरातून संत राजिंदर सिंह जी यांना गौरविण्यात आले आहे, त्यामुळे लोकांनी या संधीचा लाभ घेत जीवनात सकारात्मकता आणण्यावर भर द्यावे, असे आवाहन गोवा केंद्राचे प्रमुख वॉल्टर फर्नांडिस यांनी यावेळी सांगितले.